Priyanka Gandhi Mutual Fund Investment : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी आपली संपत्तीही जाहीर केली आहे. प्रियांका गांधी यांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती १२ कोटींहून अधिक आहे. त्यांच्याकडे ४.२४ कोटी रुपयांहून अधिक जंगम मालमत्ता आहे. त्यात म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचाही समावेश असल्याचं त्यांनी म्हटलंय.
प्रतिज्ञापत्रानुसार प्रियांका गांधी यांनी केवळ एका म्युच्युअल फंडात (Mutual Fund) गुंतवणूक केली आहे. त्यात त्यांनी सव्वा दोन कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंड (Franklin India Flexi Cap Fund) असं या म्युच्युअल फंडाचं नाव आहे. प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांनी शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. प्रियांका गांधी यांनी ज्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे, त्या म्युच्युअल फंडाचा सरासरी वार्षिक परतावा जबरदस्त आहे.
हाय रिस्क कॅटेगरीतील फंड
फ्रँकलिनच्या अधिकृत वेबसाईटनुसार हा ३० वर्षे जुना फंड आहे. हा म्युच्युअल फंड हाय रिस्क कॅटेगरीत मोडतो. हा फंड इक्विटीमध्ये ९५.९३ टक्के, डेट फंडात ०.१४ टक्के आणि उर्वरित रक्कम इतरांमध्ये गुंतवतो. ३० सप्टेंबरपर्यंत गुंतवणूकदारांची संख्या ३.२० लाख आहे.
किती आहे रिटर्न?
एकरकमी गुंतवणूक करणाऱ्यांना यानं गेल्या वर्षभरात सुमारे ४० टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, तीन वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर वार्षिक आधारावर १७.७३% परतावा दिला आहे. त्याचा परतावा ५ वर्षांत वार्षिक आधारावर चांगला राहिला आहे. या काळात त्यानं वार्षिक सरासरी २३ टक्के परतावा दिला आहे. त्याचबरोबर २० वर्षांत गुंतवणूकदारांना वार्षिक आधारावर १८.६४ टक्के परतावा दिलाय.
किती गुंतवणूकीवर किती रिटर्न?
या फंडातील २००० रुपयांच्या एसआयपीमधून तुम्ही केवळ ५ वर्षात ५ लाखांचा फंड बनवू शकता. यासाठी तुम्हाला या फंडात एकरकमी १ लाख रुपये गुंतवावे लागतील आणि त्यानंतर ५ वर्षांसाठी दरमहा २००० रुपये गुंतवावे लागतील. अशा प्रकारे ५ वर्षांत एकूण गुंतवणूक केलेली रक्कम २.२० लाख रुपये होईल. तसंच त्यावर वार्षिक २४.५४ टक्के व्याज मिळणार आहे. अशा तऱ्हेनं तुम्ही ५ वर्षात जवळपास ५.२० लाख रुपयांचा फंड जमा करू शकाल. म्युच्युअल फंडातील दीर्घकालीन गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
(टीप - यामध्ये केवळ म्युच्युअल फंडाच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)