मुंबई: कोरोना संकटाच्या काळात मुंबईच्या डबेवाल्यांची अवस्था बिकट झाली आहे. या संकट काळात डबेवाल्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. गेल्या वर्षभरात डबेवाल्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचे सांगितले जात आहे. अशातच डबेवाल्यांसाठी एक दिलासादायक वृत्त आहे. मुंबईच्या डबेवाल्यांच्या मदतीसाठी एक परदेशी बँक पुढे सरसावली असून, या बँकेने डबेवाल्यांना १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे. (hsbc bank announced rs 15 crore aid to dabbawalas of Mumbai in corona situation)
HSBC बँकेने डबेवाल्यांसाठी १५ कोटी रुपयांच्या मदतीची जाहीर केली आहे. यामुळे डबेवाल्यांना विमा, रेशन, नव्या सायकली आणि कुटुंबांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार आहे. कोरोना संकटाच्या काळात बहुतांश ऑफिसेस बंद आहेत. त्याचा थेट परिणाम मुंबईच्या डबेवाल्यांच्या व्यवसायावर झाला आहे. अनेक ठिकाणचे व्यवसाय बंद झाले आहेत. यामुळे मुंबईचा डबेवाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. यातच HSBC बँकेने जाहीर केलेली मदत उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधी यांचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार: नाना पटोले
५० टक्के सेवा प्रभावित
मॅनेजमेंट गुरू म्हणून जगप्रसिद्ध असलेल्या डबेवाल्यांनाही कोरोनाच्या परिणामांचा सामना करावा लागत असून, शाळा, महाविद्यालये, काही कार्यालये, दुकाने, मॉल्स बंद असल्याने डबे पोहोचविण्याच्या सेवेवर ५० टक्के परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यास ही सेवा काही काळ बंद ठेवण्याची वेळ डबेवाल्यांवर आली आहे. काही कार्यालयांमध्ये ५० टक्के उपस्थिती आहे. उपस्थित कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण डबेवाल्यांकडून येत असलेल्या डब्यांवर विसंबून आहेत. त्यामुळे डबेवाला नेहमीप्रमाणे डबे पोहोचविण्याचे काम करीत असले तरी कमी कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्या सेवेवरही ५० टक्के परिणाम झाला आहे.
दरम्यान, दररोज डबेवाल्यांच्या विश्वासावर निश्चिंत असलेल्या चाकरमान्यांच्या आरोग्याची काळजी डबेवालेही घेत आहेत. त्यामुळे दररोज मास्क लावणे, डबे पोहोचवित असताना हात स्वच्छ ठेवणे, जेवण वेळेत कार्यालयात पोहोचविणे आदी खबरदारी घेतली जात आहे.