financial freedom : वयाच्या साठ वर्षांपर्यंत काम करुन निवृत्ती होण्याची संकल्पना आता मागे पडत चालली आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणीने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी निवृत्ती घेतल्याचे जाहिर केलं होतं. यासाठी तिने १८ व्या वर्षापासूनच काम आणि आर्थिक नियोजन करायला सुरुवात केली होती. उर्वरित आयुष्यात मी माझ्या आवडीचं काम करणार असून जगभर फिरण्याची इच्छा तिने व्यक्त केली. तुम्हालाही अशी लवकर निवृत्त होण्याची इच्छा होते का? यासाठी तुम्ही आर्थिक स्वातंत्र होणं आवश्यक आहे. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही इतर कोणत्याही व्यक्तीवर किंवा नोकरीवर अवलंबून नाही. आजच्या युगात अनेक तरुणांना वयाच्या ३० वर्षापूर्वी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असते. यासाठी तुम्हाला आत्तापासूनच तयारी करण्याची गरज आहे.
महिन्याचं नियोजन करा
जर तुम्ही नोकरी किंवा व्यावसायिक असाल तर तुम्ही सध्याच्या महागाईच्या काळात बजेट तयार करणे गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प हे आर्थिक स्वातंत्र्याची पहिली पायरी आहे. हे तुम्हाला तुमच्या मासिक खर्चाचा मागोवा घेण्यात मदत करते, त्यामुळे तुमचे पैसे कुठे जात आहेत हे तुम्हाला कळते. चांगले बजेट तुमचे उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल राखण्यास मदत करते. बजेट तयार केल्यानंतर, आपण त्याचे नियमित पालन करणे महत्वाचे आहे.
बचतीचं व्यसन
शो ऑफच्या या जमान्यात लोक निरुपयोगी गोष्टींवर खूप खर्च करतात. त्यामुळे त्यांचे बँक खाते महिनाअखेरीस रिकामे होते. हे टाळण्यासाठी, आपल्याला बचत करणे शिकावे लागेल. जर तुम्हाला वयाच्या ३० वर्षापूर्वी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल, तर दर महिन्याला तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचत म्हणून बाजूला ठेवा. तुम्ही दरमहा तुमच्या उत्पन्नातील किमान २० टक्के बचत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
कर्जापासून दूर राहा
जर तुम्हाला लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचे असेल तर तुम्ही कर्ज टाळावे. तुम्ही काही कारणास्तव कर्ज घेतले असले तरी ते जास्त काळ ताणून ठेवू नका. लवकरात लवकर कर्जातून मुक्त व्हा. खरंतर, जेव्हा तुम्ही कर्जात बुडाता तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होणं खूप कठीण होऊन बसतं.
आपत्कालीन निधी
आपत्कालीन निधी तयार करणे हा देखील आर्थिक स्वातंत्र्याचा एक महत्त्वाचा भाग आहे. हा निधी तुम्हाला तुमच्या अनपेक्षित खर्चात मदत करू शकतो, जसे की वैद्यकीय आणीबाणी, नोकरी गमावणे किंवा इतर आपत्कालीन परिस्थिती. हा निधी किमान ६-१२ महिन्यांचा खर्च भागवण्यासाठी पुरेसा असावा.
उत्पन्नाचे स्त्रोत वाढवा
आता तुम्ही म्हणाल बचतीचे तर सर्व सांगितलं. पण, पगाराव्यतिरिक्त उत्पन्न कसं मिळवायचं हे कोण सांगणार? चला बचतीतून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेऊ. तुम्ही दरमहा तुमच्या पगारातील किमान २० टक्के बचत करणार आहात. तुम्हाला ही बचत तुमच्या बँक खात्यात ठेवण्याची गरज नाही. त्यापेक्षा ती योग्य ठिकाणी गुंतवावी लागेल. हे केवळ तुमचे पैसे सुरक्षित ठेवणार नाही तर ते वेळोवेळी वाढतही जाईल. तुम्ही यासाठी SIP द्वारे म्युच्युअल फंड किंवा विविध गुंतवणूक पर्याय निवडू शकता. मात्र, कुठेही पैसे गुंतवण्यापूर्वी तज्ज्ञांचा एकवेळ सल्ला घ्या. व्यातिरिक्त नोकरी किंवा व्यवसायातून उरलेल्या वेळात तुम्ही फ्री लान्स करुन पैसे कमवू शकता.
विमा पॉलिसी घ्यायला विसरू नका
आर्थिक सुरक्षेसाठी, तुमच्यासाठी योग्य विमा पॉलिसी असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आरोग्य विमा, मुदत विमा आणि इतर प्रकारचे विमा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देऊ शकतात. किंबहुना, या प्रकारच्या विम्याच्या मदतीने तुम्ही अनपेक्षित परिस्थितीतही स्वतःचे आर्थिक संरक्षण करू शकता.