Join us

५० लाख करदाते इन्कम टॅक्स रिफंडच्या प्रतीक्षेत, ई-पडताळणी होऊनही आयकर दावे प्रलंबित

By मनोज गडनीस | Published: March 01, 2023 11:40 AM

विवरण दाखल झाल्यानंतर १५ दिवसांत परतावा देण्यात येईल, असा दावा आयकर विभागाने केला होता.

मुंबई : गेल्या आर्थिक वर्षामध्ये आयकराचे विवरण (आयटी रिटर्न) दाखल केलेल्या आणि करदायित्वावर परतावा अपेक्षित असलेल्या ५० लाख करदात्यांना अद्याप त्यांचा परतावा मिळाला नसल्याची माहिती आहे. वास्तविक कर विवरण भरल्यानंतर जर एखाद्या करदात्याला आयकर विभागाकडून परतावा मिळणे अपेक्षित असेल, तर तो त्याला त्याचे विवरण दाखल झाल्यानंतर १५ दिवसांत देण्यात येईल, असा दावा आयकर विभागाने केला होता. मात्र, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणावर करदात्यांना परतावा न मिळाल्याने नेमकी समस्या काय आहे आणि परतावा का अडकला आहे, याचे उत्तर मात्र करदात्यांना मिळालेले नाही. 

किती विवरण, किती परतावा?गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३१ जुलैपर्यंत एकूण ५ कोटी ८२ लाख लोकांनी आपले आयकर विवरण दाखल केले होते, तर विलंब आणि सुधारित विवरण पकडून नोव्हेंबर २०२२ पर्यंत ६ कोटी ८५ लाख लोकांनी विवरण दाखल केले होते. नोव्हेंबर २०२२ पर्यंत दाखल विवरणामध्ये परतावा अपेक्षित असलेल्या लोकांना एकूण २ लाख कोटी रुपयांचा परतावा देण्यात आल्याचे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने नोव्हेंबर २०२२ मध्ये स्पष्ट केले होते.

  • नोकरदार किंवा व्यावसायिक व्यक्तींच्या व्यक्तिगत उत्पन्नासाठी आयकराचे विवरण भरण्यासाठी गेल्या आर्थिक वर्षामध्ये ३१ जुलै ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती.
  • दरवर्षीच ३१ जुलै ही आयकराचे विवरण भरण्याची शेवटची तारीख असते. मात्र, करदात्यांची वाढती संख्या आणि आयकर विभागाच्या संकेतस्थळावर येणारा ताण यामुळे आतापर्यंत ही तारीख ऑगस्ट किंवा ऑक्टोबरपर्यंत वाढविली जात होती. 
  • मात्र, गेल्या आर्थिक वर्षात आयकर विवरण भरण्यास मुदतवाढ देण्यात आली नव्हती. त्यामुळे विभागाने जशी करदात्यांना सूट दिली नव्हती, ते विचारात घेता विभागाकडूनही तातडीने आयकर विवरणांची पडताळणी आणि परतावा असलेल्या प्रकारांत परतावा देणे अपेक्षित होते. 
  • मात्र, परताव्याला विलंब का होत आहे, याचे कारणही करदात्यांना देण्यात आले नाही, असा मुद्दा सीए आशिष चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

काय आहे प्रक्रिया?

  • आयकर विभागाच्या संकेतस्थळावर लॉग इन करून जेव्हा करदाता आपले विवरण तेथे अपलोड करतो त्यावेळी त्याला त्याच्या विवरणाची पडताळणी (व्हेरिफिकेशन) 
  • करावी लागते.
  • आतापर्यंत विवरण दाखल केल्यानंतर मिळणारी पावती/चलन हे स्वाक्षरी करून विभागाच्या बंगळुरू येथील केंद्रीय कार्यालयाकडे पडताळणीसाठी पाठवले जात होते.
  • मात्र, गेल्या काही वर्षांपासून आधार आणि पॅन कार्डाची जोडणी झाल्यानंतर ई-व्हेरिफिकेशन प्रणाली अस्तित्वात आली आहे.
  • यानुसार, विवरण दाखल केल्यानंतर संबंधित करदात्याला ओटीपी पाठविण्यात येतो. तो भरल्यानंतर तत्काळ त्याच्या विवरणाची पडताळणी प्रक्रिया पूर्ण होते.
टॅग्स :इन्कम टॅक्ससरकार