जर तुम्ही आयटीआर (Income Tax Return- ITR) भरत असाल तर तुम्ही फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयरबद्दल ऐकलं असेल. फायनान्शियल इयर आणि असेसमेंट इयर याबद्दल लोकांमध्ये अनेकदा गोंधळ होतो. फायनान्शिअल इयरला 'आर्थिक वर्ष' असं म्हणतात आणि थोडक्यात FY असं लिहिलं जाते. तर असेसमेंट इयरला मूल्यांकन वर्ष म्हणतात आणि संक्षिप्त रूपात AY असं म्हटलं जातं. अनेक वेळा लोक FY ला AY मानण्याची चूक करतात. जाणून घेऊ यातील फरक.
फायनान्शियल इयर म्हणजे काय?
वर्षभराचा तो कालावधी ज्यामध्ये तुम्ही कमाई करता त्याला फायनान्शियल इयर म्हणतात. सरकारकडून सादर केला जाणारा अर्थसंकल्पही आर्थिक वर्षासाठी सादर केला जातो. कोणतंही आर्थिक वर्ष 1 एप्रिलपासून सुरू होते आणि 31 मार्च रोजी संपतं. त्यानुसार 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीला 2023-24 आर्थिक वर्ष म्हटले जाईल. अॅडव्हान्स्ड टॅक्स आणि टीडीएस फक्त आर्थिक वर्षात भरले जातात. हे दोन्ही कर तुमच्या अपेक्षित उत्पन्नाच्या अंदाजित गणनेवर आधारित असल्यानं, ती रक्कम वास्तविक रकमेपेक्षा जास्त किंवा कमी असू शकते. तुम्हाला नक्की किती रक्कम भरायची आहे हे असेसमेंट इयरमध्ये समजतं.
काय आहे असेसमेंट इयर?
आर्थिक वर्ष संपल्यानंतर लगेचच मूल्यांकन वर्ष म्हणजेच असेसमेंट इयर सुरू होतं. मूल्यांकन वर्ष म्हणजे ते वर्ष जिथे आर्थिक वर्षाच्या उत्पन्नावर कराचं मूल्यांकन करता आणि त्यानुसार आयटीआर दाखल करता. 2022-23 पर्यंतचं फायनान्शियल इयर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत होतं. या आर्थिक वर्षाचं असेसमेंट इयर 1 एप्रिल 2023 पासून सुरू झालं.
मागील आर्थिक वर्षाच्या एकूण उत्पन्नावर देय कराची रक्कम मूल्यांकन वर्षात ठरवली जाईल आणि त्यानुसार इन्कम टॅक्स भरले जाईल. याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. म्हणजेच 31 जुलै 2023 रोजी तुम्ही आर्थिक वर्ष 2022-23 च्या एकूण उत्पन्नावर आयटीआर दाखल कराल. नियमानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर एक वर्षाच्या आत विवरणपत्र सादर करणं बंधनकारक आहे. असेसमेटं इयरसाठी टॅक्स स्लॅब नियम आणि टॅक्स स्लॅब रेट्स तेच राहतात जे फायनान्शिअल इयरसाठी होते.