देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प मांडायला सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी यंदा सप्तर्षीवर लक्ष दिले जाणार असल्याचे स्पष्ट केले. याचवेळी त्यांनी २०१४ पासून देशातील नागरिकांचे दरडोई उत्पन्न दुप्पट झाल्याचेही म्हटले. यामुळे करातील सुट मिळण्याचे लिमिटही वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे सात आधार सांगितले. सप्तर्षी या अर्थसंकल्पाची सात मुख्य उद्दिष्टे आहेत – १. सर्वसमावेशक विकास, २. वंचितांना प्राधान्य, ३. पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, ४. क्षमता विस्तार, ५. हरित विकास, ६. युवाशक्ती, ७. आर्थिक क्षेत्र असे त्या म्हणाल्या. अमृत काळातील ध्येय तंत्रज्ञानावर आधारित आणि ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्था निर्माण करणे आहे. यासाठी सरकारी निधी आणि आर्थिक क्षेत्राची मदत घेतली जाईल. यासाठी लोकसहभाग, सर्वांचे सहकार्य, सर्वांचे प्रयत्न आवश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.
2014 पासून सरकारच्या प्रयत्नांमुळे सर्व नागरिकांचे जीवनमान उंचावले आहे. दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून 1.97 लाख रुपये झाले आहे. या 9 वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे., असे सीतारामन यांनी सांगितले.
महत्वाच्या घोषणा...
- मुलांसाठी आणि तरुणांसाठी राष्ट्रीय डिजिटल लायब्ररी स्थापन करण्यात येणार आहे.
- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय यावर लक्ष केंद्रित करून कृषी कर्जाचे लक्ष्य 20 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवले जाईल.
- शेतीशी संबंधित स्टार्टअपला प्राधान्य दिले जाईल.
- 2014 पासून विद्यमान 157 वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन करण्यात येणार आहेत.
- पीएम आवास योजनेचा खर्च 66% ने वाढवून 79,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त केला जात आहे.
- पुढील 3 वर्षांमध्ये, आदिवासी विद्यार्थ्यांना आधार देणाऱ्या 740 एकलव्य मॉडेल स्कूलसाठी सरकार 38,800 शिक्षक आणि सहाय्यक कर्मचारी नियुक्त करेल.