Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये मोदी सरकारने आयकरात १२ लाख रुपयांपर्यंत सूट देऊन मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, अर्थसंकल्पानंतर घर, दुकान आणि फ्लॅट खरेदी करणे किंवा बांधणे स्वस्त होणार की महाग असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी खडी, वाळू, सिमेंट, डबार, वीट आणि मार्बल यांसारख्या इमारतीशी संबंधित कोणत्याही सामग्रीवर कोणताही कर लावलेला नाही. पण, जीएसटी स्लॅब दरांमध्ये कोणतीही कपात किंवा बदल न झाल्याने काहीशी चिंता आहे.
घरांच्या किमती वाढणार?
गृहखरेदीदारांना दिलासा देण्यासाठी सरकार जीएसटीच्या १८% आणि २८% स्लॅबच्या दरांबाबत बदल करेल, अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात तसं झालं नाही. अशा परिस्थितीत वीज मीटर, सोलर पॅनल आणि इतर गोष्टींवरील अबकारी आणि कस्टम ड्युटी वाढल्यामुळे घर खरेदी करणे थोडे महाग होऊ शकते.
केंद्र सरकारने अर्थसंकल्पात घरबांधणीत वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही साहित्याच्या किंवा संबंधित वस्तूंच्या दरात वाढ केलेली नाही. विशेषत: वीट, खडी, वाळू, सिमेंट, डबार, मार्बलचे दर निश्चित करण्यात आलेले नाहीत. परंतु, असे अनेक कर लादण्यात आले आहेत, ज्यामुळे घर घेणे किंवा बांधणे महाग होऊ शकते. रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्या आहेत. या घोषणांमुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीच्या नव्या संधी निर्माण होतील, असे बोलले जात आहे. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्र गगनाला भिडणार असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
घर बांधणे महाग होईल?
मोदी सरकारने नवीन कर रचनेत बदल केल्याने करदात्यांकडे आता अधिकची बचत होणार आहे. कारण, यापुढे १२ लाखांपर्यंत कर आकारला जाणार नाही. परिणामी नोकरदार लोकांचे महिन्याला किमान ३-४ हजार रुपये वाचतील. उत्पन्नावर कोणताही कर न लावल्याने लोकांचे उत्पन्न वाढेल आणि घर खरेदीदारांकडून मागणी वाढेल. दुसरीकडे केंद्र सरकारने ना कर वाढवला ना जीसीटी दर वाढवला. अशा परिस्थितीत जर विक्रेता नवीन दराने वस्तू विकत असेल आणि बजेटनंतर भाव वाढल्याचे सांगत असेल तर तो तुमची दिशाभूल करत आहे.