Income Tax : मोदी सरकारने अर्थसंकल्पात १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करुन मध्यमवर्गीयांना मोठी भेट दिली आहे. पण, जर तुम्ही नोकरदार असाल तर १३.७ लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर कर सवलत घेऊ शकता. ही अतिरिक्त बचत ७५,००० रुपये स्टँडर्ड डिडक्शन आणि NPS मधील गुंतवणुकीतून मिळणार आहे. आयकर कायद्याच्या कलम ८०CCD (२) अंतर्गत, एनपीएसमध्ये कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या १४ टक्क्यांपर्यंतची गुंतवणूक कर सवलतीच्या कक्षेत येते. अशा प्रकारे, वार्षिक १३.७ लाख रुपये कमावणारी व्यक्ती पेन्शन योजनेत योगदान देऊन त्याचा कर ९६,००० रुपयांनी कमी करू शकते. मात्र, यामध्ये तुमच्या कंपनीची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
१३.७ लाखांच्या उत्पन्नावर कर सवलत कशी मिळवायची?
समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे वार्षिक उत्पन्न १३.७ लाख रुपये आहे. यामध्ये ५०% मूळ वेतन ६.८५ लाख रुपये आहे, तर १४% एनपीएस योगदान ९५,९०० रुपये असेल. यात ७५,००० रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनसह, संपूर्ण १३.७ लाख रुपयांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. आश्चर्याची बाब म्हणजे लाखो करदाते या संधीचा लाभ घेत नाहीत. मोदी सरकारने एनपीएस योजना १० वर्षांपूर्वी आणली आहे. परंतु, केवळ २२ लाख करदात्यांनी त्यात गुंतवणूक केली आहे.
एनपीएस योजनेला कमी प्रतिसाद का?
एनपीएस योजनेला कमी प्रतिसाद मिळण्याचे कारण कार्पोरेट क्षेत्र असल्याचे सांगितले जाते. कारण, काहीच कंपन्या NPS लाभ सुरू करण्यात रस दाखवतात. बरेच गुंतवणूकदार लांबलचक लॉक-इन आणि मॅच्युरिटीच्या वेळी पैसे काढण्यावरील निर्बंध यामुळे निराश होतात. यामध्ये अपवादात्मक परिस्थिती वगळता निवृत्तीपूर्वी पैसे काढता येत नाहीत. मॅच्युरिटीवरही, केवळ ६०% रक्कम काढता येते तर उर्वरित ४०% रक्कम आजीवन पेन्शन मिळवण्यासाठी वार्षिकीमध्ये अनिवार्यपणे गुंतवावी लागते.
१२ लाखांच्या पुढेही मिळणार फायदा
मोदी सरकारने केवळ १२ लाख उत्पन्न असलेल्या करदात्यांनाच दिलासा दिलेला नाही. तर १२ लाख ते ५० लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. १२ उत्पन्न असलेल्या करदात्याला ८० हजार रुपये फायदा मिळेल. तर १६ लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या करदात्याला ५० हजार रुपयांचा फायदा होईल. हेच उत्पन्न २० लाख रुपये झाले तर ९० हजार रुपयांची बचत होणार आहे. तर २४ लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्यांचे आता १,१०,००० रुपये वाचतील. ५० लाखांपर्यंत कमावणारे करदाते १,१०,००० रुपये बचत करू शकतात.