Join us

Diwali Gifts Tax : दिवाळी भेटवस्तूंना करात सूट मिळते का?, जाणून घ्या उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:21 PM

दिवाळीमध्ये सगळ्यांना विविध भेटवस्तू मिळत असतात. परंतु आयकरामध्ये या भेटवस्तूंना सूट मिळते का? जाणून घ्या

अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळी जवळ आली आहे. दिवाळीमध्ये सगळ्यांना विविध भेटवस्तू मिळत असतात. परंतु आयकरामध्ये या भेटवस्तूंना सूट मिळते का?

कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, अनेक करदात्यांना दिवाळी दरम्यान भेटवस्तूंमधून आर्थिक लाभ होत असतो. परंतु जर तिसऱ्या व्यक्तीकडून मिळालेल्या भेटवस्तूचे मूल्य ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर अशा भेटवस्तूंना सूट मिळत नाही.

अर्जुन : कृष्णा, आयकरामध्ये कोणत्या भेटवस्तूंना सूट आहे? 

कृष्ण : अर्जुना, खालील भेटवस्तूंना आयकरामध्ये सूट आहे.

१) आयकर कायद्यात सूचित केलेल्या नातेवाइकांकडून मिळालेली भेटवस्तू. २) इतर व्यक्तींकडून ५० हजार रुपयांपर्यंत मिळालेली भेटवस्तू.  ३) लग्नानिमित्त मिळालेली भेटवस्तू. ४) वारसदार म्हणून मिळालेली भेटवस्तू. ५) आयकर कायद्यांतर्गत अधिसूचित ट्रस्ट किंवा संस्थांकडून मिळालेली भेटवस्तू. ६) कर्मच्याऱ्याला एका आर्थिक वर्षात ५० हजार रुपयांपर्यंत मिळालेली भेटवस्तू. 

अर्जुन : कृष्णा, जर भेटवस्तू ‘लाभ किंवा अतिरिक्त फायदे’ (पर्कविझिट) म्हणून देण्यात आली तर? 

कृष्ण : अर्जुना, जर व्यावसायिक रहिवाशांना खालील प्रकारे ‘लाभ किंवा अतिरिक्त फायदे’ देण्यात आले आणि अतिरिक्त फायद्याचे मूल्य एका आर्थिक वर्षात २० हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर १ जूलै २०२२ पासून कलम १९४ आर अंतर्गत १० टक्के टीडीएस लागू होईल.

१) सर्वसाधारणपणे भांडवल म्हणून वापरण्यात येणारी मालमत्ता जसे, कार, जमीन आदी. २) वस्तूंचे फ्री सॅम्पल. ३) रोख स्वरूपात किंवा टीव्ही, संगणक, सोन्याचे नाणे आदी स्वरूपात. ४) ठराविक लक्ष्य प्राप्त केल्यावर फ्री ट्रीप.

अर्जुन : कृष्णा, करदात्यांनी यातून काय बोध घ्यावा? 

कृष्ण : अर्जुना, आजच्या युगात खूप कमी लोक आनंदाने आणि निस्वार्थ भावनेने भेटवस्तू देतात. अनेक करदाते करचोरी करण्यासाठी भेटवस्तूंचा मार्ग निवडत होते. त्यामुळे सरकाराने १ जुलै २०२२ पासून अशा जाचक तरतुदी लागू केल्या. प्रत्येक व्यक्तीने आपली संपत्ती कठोर परिश्रमाने कमवावी आणि ती जपावी. भेटवस्तूंचा आदरही केला पाहिजे. कारण ती भावनांनी भरलेली अमूल्य अशी गोष्ट आहे.

उमेश शर्मा, चार्टर्ड अकाउंटंट

टॅग्स :दिवाळी 2021इन्कम टॅक्स