Join us  

भारतात GST चे ५ स्लॅब; पण 'या' देशांमधील टॅक्स सिस्टीमपाहून खुश व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 4:02 PM

GST Slab : कर प्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटी लागू केल्याचा दावा सरकार करते. मात्र, जीएसटीचे ५ स्लॅबने खरच करप्रणाली सुलभ झाली की गोंधळ वाढला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इतर देशात काय स्थिती आहे.

GST Slab : देशात नवीन करप्रणाली GST लागू झाल्यापासून अजूनही गोंधळ सुरुच आहे. कोणती वस्तू किंवा सेवा कुठल्या टॅक्स स्लॅबमध्ये जाईल यात आतापर्यंत अनेक बदल झाले आहेत. देशात आपल्याला जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी जीएसटी भरावा लागतो. हा दर 5 ते 28 टक्क्यांपर्यंत असू शकतो. कार, ​​सोडा इत्यादी लक्झरी वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागू होतो, तर ताज्या भाज्या, फळे, दूध इत्यादी वस्तू जीएसटीच्या कक्षेबाहेर आहेत. जीएसटीमध्ये 5 वेगवेगळे स्लॅब असल्याने प्रचंड गोंधळ होतो. कोणत्या वस्तूंवर किती जीएसटी आकारला जाईल याची फारशी माहिती लोकांकडे नाही. कल्पना करा, जर एक किंवा दोन स्लॅब असते तर किती बरे झाले असते ना? हे आपल्या देशात नसले तरी अनेक देशात केवळ एक किंवा दोनच स्लॅब आहे.

GST (वस्तू आणि सेवा कर) ही एक अप्रत्यक्ष कर प्रणाली आहे, जी 1 जुलै 2017 रोजी भारतात लागू करण्यात आली. विविध केंद्रीय आणि राज्य करांचे एकत्रीकरण करणे हा याच्या अंमलबजावणीचा उद्देश होता, जेणेकरून संपूर्ण देशात एकसमान कर प्रणाली असेल आणि व्यवसाय प्रक्रिया सुलभ होईल. यापूर्वी, वस्तू आणि सेवांवर स्वतंत्र कर लादण्यात आले होते, ज्यामुळे प्रणाली गुंतागुंतीची होती. जीएसटीमुळे ही गुंतागुंत दूर झाली आणि व्यवसाय सुलभ झाला. GST अंतर्गत, वस्तू आणि सेवांवर 0%, 5%, 12%, 18% आणि 28% असे पाच कर स्लॅब सेट केले आहेत.

कोणत्या देशात जीएसटी प्रणाली सुलभ आहे?जीएसटी कोणत्याही देशाच्या आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळेच अनेक देशांनी ही पद्धत स्वीकारली आहे. अनेक देशांमध्ये याला व्हॅट म्हणूनही ओळखले जाते. पण त्याची पद्धत जीएसटीसारखीच आहे. सिंगापूर, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएई सारख्या प्रगतशील देशांमध्येही जीएसटी लागू आहे. पण या देशांमध्ये एक किंवा दोनच कर स्लॅब आहेत.

सिंगापूर (1 स्लॅब: 8%): सिंगापूरमध्ये फक्त एक GST स्लॅब आहे, जो 8% आहे. येथे किराणा, वैद्यकीय सेवा आणि शिक्षण सेवा यासारख्या अत्यावश्यक वस्तूंवर कोणताही GST नाही. केवळ लक्झरी वस्तू आणि इतर सर्व वस्तूंवर 8% GST लागू आहे. जर तुम्हाला टिफिन बॉक्स किंवा महागडी कार घ्यायची असेल तरीही तुम्हाला फक्त 8 टक्के दराने कर भरावा लागेल. सिंगापूरची ही करप्रणाली अतिशय सोपी आणि प्रभावी मानली जाते.

न्यूझीलंड (1 स्लॅब: 15%): न्यूझीलंडमध्ये GST 15% आहे आणि त्यात कोणतीही सूट नाही. याचा अर्थ असा की तुम्ही किराणा सामान खरेदी करा किंवा महागडी वाहने, प्रत्येक गोष्टीवर 15% GST लागू आहे. इथे कोणत्याही गोष्टीवर जीएसटी फ्री स्लॅब नाही.

ऑस्ट्रेलिया (1 स्लॅब: 10%): ऑस्ट्रेलियामध्ये एकच GST स्लॅब आहे, जो 10% आहे. परंतु ताजे अन्न, आरोग्य सेवा आणि शिक्षण यासारख्या काही आवश्यक वस्तूंवर जीएसटी लागू होत नाही. इतर सर्व वस्तू, मग ते सामान्य असो किंवा लक्झरी, 10% कर लावण्यात येतो.

कॅनडा (2 स्लॅब: 5% आणि 13-15%): कॅनडामध्ये दोन कर स्लॅब आहेत. 5 टक्के आणि 13-15 टक्के पर्यंत. 5% स्लॅब फेडरल GST म्हणून लागू होतो, तर 13-15% स्लॅब प्रांतीय स्तरावर लागू होणारा HST म्हणून काम करतो. खाद्यपदार्थ आणि मूलभूत आरोग्य सेवांवर कोणताही जीएसटी नाही, तर लक्झरी वस्तूंवर 15% पर्यंत कर लागू आहे.

संयुक्त अरब अमिराती (UAE) (1 स्लॅब: 5%): UAE मध्ये 5 टक्के कर आकारला जातो. आरोग्य, शिक्षण आणि काही सरकारी सेवा यासारख्या काही जीवनावश्यक वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. लक्झरी वस्तू आणि महागड्या वस्तूंवर 5% VAT लागू आहे. म्हणूनच दुबईत आयफोन आणि इतर वस्तू स्वस्त मिळतात.

भारतातील जीएसटी स्लॅब कसा आहे?0% GST (शून्य-रेट किंवा सूट श्रेणी): या स्लॅबमध्ये ताज्या भाज्या, फळे, दूध, दही, पुस्तके आणि आरोग्य आणि शिक्षण सेवा यासारख्या आवश्यक वस्तूंचा समावेश आहे. यावर कोणताही कर नाही.

5% GST: हा स्लॅब अत्यावश्यक असलेल्या परंतु किरकोळ कर आकारलेल्या वस्तू आणि सेवांना लागू होतो. पॅकेज केलेले खाद्यपदार्थ, ₹1,000 पेक्षा कमी किमतीचे शूज आणि स्वस्त कपडे या श्रेणीत येतात. रेल्वे प्रवास आणि इकॉनॉमी क्लास विमान तिकीट देखील या स्लॅब अंतर्गत येतात.

12% GST: हा स्लॅब मध्यम श्रेणीच्या वस्तूंवर लागू होतो, जे अंशतः आवश्यक आणि अंशतः लक्झरी आहेत. प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, कूलर आणि गिझरसारखी मूलभूत उपकरणे आणि रु. 1,000 ते 7,500 रु. पर्यंतची हॉटेल्स या श्रेणीत येतात.

18% GST: हा स्लॅब बहुतांश ग्राहकोपयोगी वस्तू आणि सेवांवर लागू होतो. यामध्ये लॅपटॉप, संगणक, केसांचे तेल, टूथपेस्ट आणि नॉन-एसी रेस्टॉरंट सेवा यासारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा समावेश आहे.

28% GST: हा स्लॅब लक्झरी मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर लागू होतो. कार, ​​हाय-एंड मोटारसायकल, खाजगी जेट, तंबाखू उत्पादने, रिव्हॉल्व्हर, पिस्तूल, मॉनिटर आणि प्रोजेक्टर आणि सोडा या श्रेणीत येतात. 

टॅग्स :करइन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालयआयकर मर्यादा