Join us  

F&O SEBI : फ्युचर अँड ऑप्शनमध्ये वर्षभरात गुंतवणूकदारांचे ₹६०००० कोटी बुडाले; सेबी प्रमुख म्हणाल्या, "ही रक्कम.."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 12:18 PM

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्यानं त्यावर प्रत्येक वेळी फायदा होतोच असा नाही. दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी फ्युचर अँड ऑप्शन (F&O) बाबत मोठं वक्तव्य केलं. पाहा काय म्हणाल्या बूच

शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीच्या अधीन असल्यानं त्यावर प्रत्येक वेळी फायदा होतोच असा नाही. दरम्यान, सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बूच यांनी मंगळवारी फ्युचर अँड ऑप्शन (F&O) बाबत मोठं वक्तव्य केलं. फ्युचर अँड ऑप्शनमध्ये गुंतवणूक केल्यानं देशातील गुंतवणूकदारांना वर्षभरात ६० हजार कोटी रुपयांचं नुकसान सोसावं लागल्याची माहिती त्यांनी दिली. बाजार नियामक सेबीच्या (SEBI) प्रमुख माधबी पुरी बूच या नॅशनल स्टॉक एक्सचेंजद्वारे आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

"एफ अँड ओ सेगमेंटला दरवर्षी ५० ते ६० हजार कोटी रुपयांचा तोटा होत असेल, तर तो व्यापक मुद्दा का नाही म्हणता येणार? ही रक्कम आगामी आयपीओ, म्युच्युअल फंड किंवा इतर उत्पादक कारणांसाठी गुंतवली जाऊ शकली असती," असं माधबी पुरी बूच म्हणाल्या.

पेटीएमवरही वक्तव्य

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्यासाठी बँका ग्राहकांच्या अशाच केवायसी पडताळणीचा वापर करण्याची शक्यताही सेबी प्रमुखांनी फेटाळून लावली आणि सेबी, सिक्युरिटीज मार्केटमध्ये पेटीएमसारखी हेराफेरी खपवून घेणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय आहे रिपोर्ट?

सेबीच्या एका रिपोर्टनुसार ९० टक्के व्यवहार तोट्यात होते. भांडवली बाजार नियामकानं मंगळवारी एक पत्र जारी केलं, ज्यात या व्यवहारांवर मर्यादा आणण्याचे मार्ग सुचवले गेले. "एफ अँड ओ कमी झाल्यास शेअर बाजाराला कमी शुल्क मिळू शकतं, परंतु दीर्घ काळासाठी ते सर्व भागधारकांसाठी फायदेशीर ठरेल. एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ) गुंतवणूकदारांसाठी जोखमीच्या डेरिव्हेटिव्ह अॅक्टिव्हिटीला पर्याय ठरू शकत नाहीत. त्यांची लिक्विडिटी आणि परतावा खूप वेगळा असतो," असंही बूच म्हणाल्या.

टॅग्स :व्यवसायसेबी