लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : आयकर वाचविण्यासाठी गृहकर्ज व जीवन विम्याशिवाय इतरही अनेक मार्ग आहेत. आपल्या आई-वडिलांना भेट देऊनही कर वाचविता येतो. आई-वडिलांचा आरोग्य विमा भरूनही कर सवलत मिळविता येते. चला तर, आज कर बचतीच्या अशा काही अनोख्या मार्गांबाबत जाणून घेऊ या.
विवाह भेटवस्तू
विवाहात मिळालेल्या भेटी व वस्तूंवर आयकर कायद्याच्या कलम ५६ (२) अन्वये कर सवलत मिळते. तुम्हाला लग्नात अशा भेटवस्तू मिळाल्या असतील, तर तुम्ही कर सवलतीसाठी दावा करू शकता. यात भेटवस्तूंसोबत रोख रक्कम, धनादेशांचाही समावेश आहे.
आई-वडिलांना रोख भेट : आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांना स्वतंत्रपणे कर सवलत मिळते. तुमचे करपात्र उत्पन्न कमी करण्यासाठी तुम्ही तुमच्या पालकांना रोख रक्कम भेट देऊ शकता. तुमचे पालक ही रक्कम ज्येष्ठ नागरिक योजना अथवा ज्येष्ठ नागरिक एफडीमध्ये गुंतवून करसवलत मिळवू शकतात.
आरोग्यावरील खर्च : आरोग्यावर केलेल्या खर्चावरही तुम्ही करसवलत मिळवू शकता. कलम ८०डी अन्वये २५ हजारांपर्यंतच्या आरोग्य विमा हप्त्यावर तुम्ही कर सवलत मिळवू शकता. याशिवाय तुमच्या पालकांच्या आरोग्य विम्याचा हप्ता तुम्ही भरत असाल तर त्यावरही तुम्ही कर सवलतीसाठी दावा करू शकता.
दानधर्म : दान आणि धर्मादाय खर्च करूनही तुम्ही कर वाचवू शकता. काही देणग्यांवर तुम्हाला १०० टक्के कर वजावट मिळते, तर काहींवर ५० टक्के वजावट मिळते. रोख अथवा धनादेशाद्वारे दिलेल्या देणग्यांवर ही सवलत मिळते.