Join us

जीएसटी नोंदणी आता पूर्वीपेक्षा सुलभ; व्यावसायिकांसाठी सुरू केली नवीन सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 16:54 IST

gst registration : वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने जीएसटी नोंदणी अधिक सुलभ केली आहे. यापाठीमागे व्यावसायिक आणि सरकार दोन्हींचा फायदा आहे.

gst registration : तुम्ही जर नवीन व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. वस्तू आणि सेवा कर नेटवर्कने उद्योजकांच्या सोयी लक्षात घेऊन प्रणालीमध्ये सुधारणा केली आहे. आता कंपनीचे प्रोमोटर आणि संचालक त्यांच्या गृहराज्यातच जीएसटी नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्यांचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करू शकतात. यापूर्वी, जीएसटी नोंदणी मिळविण्यासाठी, एकतर ओटीपी व्हेरिफिकेशन प्रक्रिया आवश्यक होती किंवा कंपनीच्या नोंदणीकृत अधिकारक्षेत्रातील जीएसटी सुविधा केंद्राला भेट देऊन बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावे लागे.

गृहराज्यातच होणार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशननवीन व्यावसायिकांच्या सोयीसाठी सरकारने ही प्रक्रिया सुलभ करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी ज्या राज्यात तुम्ही जीएसटी नोंदणी करत आहात, त्याच राज्यात बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन करावे लागे. मात्र, यात आता बदल करण्यात आला आहे. आता बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन प्रक्रिया जीएसटी नोंदणी केलेल्या राज्याऐवजी गृहराज्यात पूर्ण केली जाऊ शकते.

उदाहरणार्थ, जर तुमची कंपनी हैदराबादमध्ये नोंदणीकृत असेल आणि तुम्ही महाराष्ट्रातील असाल, तर तुम्हाला हैदराबादमध्ये जाऊन GST नोंदणी पूर्ण करावी लागे. पण, ३ मार्च २०२५ रोजी GSTN ने केलेल्या या अपडेटमुळे, तुम्ही आता हैदराबादमध्ये न येता महाराष्ट्रातून GST नोंदणी पूर्ण करू शकता.

बनावट नोंदणी रोखण्यासाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरूतज्ज्ञांचे म्हणणे आहे की सरकारने इनपुट टॅक्स क्रेडिट दावा करण्यासाठी बनावट नोंदणी रोखण्यासाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुरू केले होते. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन निवडल्याने करदात्यांना कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पडताळणीबद्दल वेगळे पुरावे मिळतात, जे आवश्यक असल्यास न्यायालयात केस मजबूत करू शकतात.

व्यावसियाकांनी काय करावं?तज्ञांचे म्हणणे आहे की जीएसटीसाठी नोंदणी करणाऱ्या प्रत्येकाने नेहमी बायोमेट्रिक प्रमाणीकरणाचा पर्याय निवडला पाहिजे. कारण तो जीएसटी नोंदणीमध्ये सुरक्षितता आणि प्रमाणिकतेचा अतिरिक्त पुरावा आहे. यापूर्वी, जेव्हा बायोमेट्रिक प्रमाणीकरण पर्याय उपलब्ध नव्हता, तेव्हा अनेक बनावट नोंदणी आणि इनपुट टॅक्स क्रेडिटचा (ITC) गैरवापर झाला होता.

टॅग्स :जीएसटीमुख्य जीएसटी कार्यालयइन्कम टॅक्समुख्य आयकर आयुक्त कार्यालय