Join us

GST Collection: जीएसटीनं भरली सरकारी तिजोरी, एप्रिल महिन्यात झालं विक्रमी कलेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2024 2:10 PM

GST Collection: देशातील वस्तू व सेवा कराच्या संकलनाच्या आकडेवारीनं सर्व विक्रम मोडले असून तो उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

GST Collection: देशातील वस्तू व सेवा कराच्या संकलनाच्या (GST Collection) आकडेवारीनं सर्व विक्रम मोडले असून तो उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपयांवर आलं आहे.

जीएसटी संकलनानं यंदा मोठा महसूल मिळवला असून सरकारची तिजोरी भरली आहे. एका महिन्यात पहिल्यांदाच जीएसटी महसुलानं दोन लाख कोटींचा टप्पा ओलांडलाय. एप्रिल २०२४ मध्ये जीएसटी संकलन २.१० लाख कोटी रुपये होतं आणि हे एक ऐतिहासिक संकलन आहे. ग्रॉस रेव्हेन्यूमध्ये वार्षिक आधारावर १२.४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. रिफंडनंतरचं निव्वळ उत्पन्न १.९२ लाख कोटी रुपये असून ते वार्षिक आधारावर १७.१ टक्क्यांनी वाढलंय. 

निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती 

विक्रमी जीएसटी संकलनामुळे सरकार अतिशय खूश असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ही आकडेवारी पोस्ट करून आनंद व्यक्त केला. देशांतर्गत व्यवहारात १३.४ टक्के आणि आयातीत ८.३ टक्के वाढ झाल्यानं जीएसटी संकलनात ही वाढ झाली आहे. 

 

पाहा आकडेवारी

  • सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (सीजीएसटी) : ४३,८४६ कोटी रुपये
  • स्टेट गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (एसजीएसटी)- ५३,५३८ कोटी रुपये
  • इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स (आयजीएसटी) - ९९,६२३ कोटी रुपये, त्यापैकी ३७,८२६ कोटी आयातीत वस्तूंमधून गोळा केले.
  • सेस : १३,२६० कोटी रुपये, यात आयीतीत वस्तूंमधून १००८ कोटी रुपये गोळा करण्यात आलेत.
टॅग्स :जीएसटीनिर्मला सीतारामनसरकार