दिवाळीत सोने खरेदी करणार असाल तर थोडी काळजी घ्या. धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्याची खरेदी शुभ असते असं म्हणतात. त्यातच आता लग्नाचा हंगाम सुरू आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात दागिन्यांची खरेदी केली जाऊ शकते. परंतु अशा परिस्थितीत इन्कम टॅक्स आणि इतर सरकारी नियम देखील जाणून घेतले पाहिजेत. दरम्यान, सोनं खरेदी आणि ठेवण्याबाबत काही महत्त्वाचे नियम आहेत, त्यांचं उल्लंघन केल्यास तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता आणि टॅक्स अथॉरिटीच्या नजरेत येऊ शकता.डॉक्युमेंट्स लागतात का?तुम्ही सोने खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला पॅनकार्ड किंवा तत्सम केवायसी दस्तऐवज विचारले जाऊ शकतात. देशातील काही व्यवहारांसाठी पॅनकार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं आहे, जेणेकरून काळ्या पैशाचा वापर थांबवता येईल. तुम्ही २ लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचं सोने खरेदी केल्यास तुम्हाला पॅन दाखवावं लागेल. आयकर नियमांच्या कलम ११४बी अंतर्गत देशात हा नियम लागू करण्यात आलाय. १ जानेवारी २०१६ पूर्वी ५ लाख रुपयांपेक्षा जास्त सोन्याच्या खरेदीवर पॅन दाखवण्याची तरतूद होती.कॅशमध्ये किती खरेदी करू शकता?यासोबतच हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की, तुम्ही फक्त रोखीनं २ लाख रुपयांपर्यंतचं सोनं खरेदी करू शकता. तुम्ही या रकमेपेक्षा जास्त किमतीचं सोनं खरेदी केल्यास, तुम्हाला ते कार्डद्वारे किंवा पॅनकार्डसह चेकद्वारे खरेदी करावं लागेल. जोपर्यंत रोख व्यवहारांचा संबंध आहे, त्या ठिकाणी आयकर कायद्याचे कलम २९६एसटी आहे. या अंतर्गत, तुम्ही एका दिवसात २ लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहार करू शकत नाही, त्यामुळे जर तुम्ही २ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख देऊन सोनं खरेदी केलं तर तुम्ही नियमांचे उल्लंघन केल्याचं मानलं जातं. यावर एक दंड देखील आहे, जो रोख रक्कम घेणाऱ्या व्यक्तीवर लावला जातो.किती सोनं बाळगू शकता?
- एक विवाहित महिला आपल्याकडे ५०० ग्रामपर्यंत सोनं ठेवू शकते.
- अविवाहित महिला आपल्याकडे २५० ग्रामपर्यंत सोनं ठेवू शकते.
- एक पुरुष आपल्याकडे १०० ग्रामपर्यंत सोनं ठेवू शकतो.
या मर्यादेच्या वरही तुम्हाला सोनं बाळगण्याची परवानगी आहे. परंतु ते सोनं कुठून आलं याचं उत्तर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.