Join us

मलाही कर शून्य करायची इच्छा आहे, पण...; अर्थमंत्री पहिल्यांदाच लाखोंच्या मनातले बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2024 8:31 AM

Nirmala Sitharaman speech: अनेकदा आयकर बंद करण्याची मागणी केली जाते. उद्योजक असो की पगारदार सर्वांनाच या कर प्रणालीचा वैताग आलेला आहे.

अनेकदा आयकर बंद करण्याची मागणी केली जाते. उद्योजक असो की पगारदार सर्वांनाच या कर प्रणालीचा वैताग आलेला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या एका कार्यक्रमात एका उद्योजकाने आम्ही कष्ट करतो, कर्ज घेतो उद्योग करतो आणि त्यातून फायदा कमावतो, जो काही फायदा कमावतो त्यापैकी बराच पैसा आम्ही सरकारला कर म्हणून देतो, असे सांगत हिशेबच मांडला होता. यावर त्यांनी साधक बाधक प्रतिक्रिया देत विषय टाळला होता. मंगळवारी एका कार्यक्रमात सीतारमन यांनी आपणही कर जवळजवळ झिरो करण्याची इच्छा आहे, असे म्हटले आहे. 

आपणासही कर शून्य करण्याची इच्छा आहे. परंतू देश वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत आहे. यासाठी सामुग्री गोळा करण्याची गरज आहे. यामुळे रिसर्च आणि डेव्हलपमेंटवर जास्त पैसा खर्च करता येणार आहे. अनेकदा मला अर्थमंत्री असल्याने आमची कर प्रणाली अशी का आहे, याचे उत्तर द्यावे लागते, असे सीतारमन म्हणाल्या. भोपाळ येथील आयआयएसईआरच्या ११ व्या दीक्षांत समारंभात अर्थमंत्री निर्मला सीतारामन बोलत होत्या.

कर शून्य करणे शक्य नाही कारण देश चालवण्यासाठी पैशांची गरज आहे. रिन्यूएबल एनर्जी आणि त्याच्या साठवणुकीवर जास्तीत जास्त संशोधन करण्याचे आवाहन त्यांनी शास्त्रज्ञांना केले. झपाट्याने वाढणाऱ्या भारतासाठी आणि पर्यावरण वाचवण्यासाठीही हे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. विकसित देशांनी वारंवार दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. जीवाश्म इंधनापासून अक्षय ऊर्जेकडे वळण्यासाठी भरपूर पैसे देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते पैसे अद्याप आलेले नाहीत. पॅरिस करारातील आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :निर्मला सीतारामनइन्कम टॅक्स