अर्जुन : कृष्णा, आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ आहे. आयकर रिटर्न वेळेत न भरल्यास त्याचा काय परिणाम होईल? कृष्ण : अर्जुन, आयकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास त्याचे पुढीलप्रमाणे परिणाम होऊ शकतात.
१. जर करदात्याने आपले आयकर रिटर्न ३१ जुलैनंतर परंतु ३१ डिसेंबरपर्यंत दाखल केले तर त्याला पाच हजार रुपये लेट फी भरावी लागेल. जर करदात्याचे एकूण उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल तर एक हजार रुपये लेट फी भरावी लागेल.
२. आयकर रिटर्न वेळेत दाखल न केल्यास करदात्याला प्रतिमाह एक टक्का व्याज रिटर्न दाखल करण्याच्या तारखेपर्यंत कराच्या रकमेवर भरावे लागेल.
३. जर करदात्याला काही रिफंड येणार असेल, परंतु त्याने आयकर रिटर्न उशिरा दाखल केले असेल तर त्याचे रिफंड येण्यामध्ये विलंब होऊ शकतो आणि रिफंडवरील व्याजाचेसुद्धा नुकसान होऊ शकते.
४. आयकर रिटर्न वेळेत दाखल न केल्याने करदात्याला आपले चालू वर्षातील नुकसान पुढील वर्षात नेता येणार नाही.
५. जर करदात्यावर आयकर भरण्याचे महत्त्वपूर्ण दायित्व असेल, परंतु त्याने आयकर रिटर्न दाखल केले नसेल तर आयकर विभाग करदात्याकडून अतिरिक्त दंड आकारू शकतो.
अर्जुन : कृष्णा, जर करदात्याने आयकर रिटर्न दाखल करण्याची अंतिम तारीख चुकवली असेल तर त्याला कसे सुधारता येईल?
कृष्ण : अर्जुन, जर करदात्यांनी आर्थिक वर्ष २०२३-२४ च्या आयकर रिटर्नची अंतिम तारीख चुकवली असेल तर करदाते लेट फी आणि व्याज भरून आपले आयकर रिटर्न ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत दाखल करू शकतात.
अर्जुन : कृष्णा, यातून काय बोध घ्यावा?
कृष्ण : अर्जुन, आयकर रिटर्न वेळेत दाखल केल्याने करदाते आयकर विभागाच्या विविध चौकशीपासून आपला बचाव करू शकतात आणि कर कायद्याचे पालन करून देशाच्या विकासात हातभार लावू शकतात. आयकर रिटर्न वेळेत दाखल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपले आर्थिक नुकसान आणि त्रास दोन्ही वाचेल.