पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 30 जून 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती. आता मुदत संपली असून ज्यांनी हे काम केलं नाहीये त्यांना आर्थिक व्यवहार करणं कठीण होणारे. दरम्यान, ज्यांनी पॅन आधार लिंक केली नाहीत त्यांची पॅन कार्ड निष्क्रिय केलं जाणार असल्याचं यापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.
तुम्ही 30 जून 2023 पर्यंत आधार आणि परमनंट अकाउंट नंबर (PAN) लिंक करू शकला नसाल तर तुम्हाला काही आर्थिक व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. ज्या ठिकाणी पॅन कार्ड अनिवार्य आहे अशा ठिकाणी तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागेल. सीबीडीटीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, जर अंतिम मुदतीपूर्वी पॅन आणि आधार लिंक केले नाही तर 1 जुलै 2023 पासून पॅन निष्क्रिय करण्यात येणार होतं. अशा स्थितीत अनेकांचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहेत. पॅनला आधारशी लिंक करण्यासाठी, ई-फायलिंग पोर्टलद्वारे 1,000 रुपयांचं शुल्क भरावं लागणार आहे.
1,000 रुपयांचं शुल्क भरल्यानंतर आधार कार्डाची माहिती देऊन 30 दिवसांच्या आत पॅन पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते. पीआयबीनं 28 मार्च 2023 रोजी एक प्रेस रिलीज जारी केले होते. त्यानुसार, 1,000 रुपये शुल्क भरल्यानंतर, निर्धारित प्राधिकरणाला आधारची माहिती देऊन 30 दिवसांत पॅन पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते असं सांगण्यात आलं होतं.
आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख चुकलेली व्यक्ती अंतिम मुदतीनंतरही ते लिंक करू शकते. दरम्यान, त्यांचं पॅन 30 दिवसांच्या आत पुन्हा सक्रिय केलं जाईल. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीनं 20 जुलै रोजी (दंड भरल्यानंतर) आपला पॅन आधारशी लिंक करण्याची विनंती केली तर, 19 ऑगस्ट रोजी किंवा त्यापूर्वी पॅन सक्रिय केले जाईल. परंतु जोपर्यंत पॅन कार्ड निष्क्रिय राहील, तोपर्यंत तुमच्याकडे पॅन कार्ड नाही असं गृहित धरुन त्या परिणामांना सामोरं जावं लागेल. यापैकी काही उत्पन्नावर अधिक टीडीएस, इन्कम टॅक्स रिफंड न मिळणं अशा गोष्टींचा समावेश होऊ शकतो.
लिंकिंगची स्थिती कशी पाहाल?
- आयकर विभागाच्या या incometax.gov.in/iec/foportal/ अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- लिंक सेक्शन ओपन करा आणि लिंक आधार स्टेटस हा पर्याय निवडा.
- तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाका.
- 'View Link Aadhaar Status' या पर्यायावर क्लिक करा.
- तुम्हाला स्क्रीनवर पॅन-आधार लिंक स्टेटस दिसेल.
- तुमचे पॅन कार्ड आणि आधार लिंक असल्यास, लिंक्ड असं दिसून येईल. अन्यथा, ते लिंक करण्यासाठी माहिती दाखवेल.