Income Tax Slab: आयकर भरणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही टॅक्स भरत असाल तर आता तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. जर तुमचा वार्षिक पगार १०.५ लाख रुपये असेल तर तुम्ही या पगारावर १०० टक्के टॅक्स देखील वाचवू शकता. इतक्या उत्पन्नावरही तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.
२.५ लाखांपर्यंतचे उत्पन्न आहे करमुक्त
आयकराच्या नियमानुसार २.५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे, परंतु असं असतानाही तुमचं उत्पन्न जर १०.५ लाख रुपयांपर्यंत असेल तरीही तुम्हाला एक रुपयाही कर भरावा लागणार नाही.
५०,००० रुपयांचे स्टँडर्ड डिडक्शन
जर कोणत्याही व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १० लाख ५० हजार रुपये असेल, तर तुम्हाला ५०,००० रुपयांचे थेट स्टँडर्ड डिडक्शन मिळते. या स्थितीत तुमचे करपात्र उत्पन्न १० लाख रुपये होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार या बजेटमध्ये स्टँडर्ड डिडक्शन ५०,००० रुपयांवरून ७०,००० रुपयांपर्यंत वाढवू शकते.
80C मध्ये मिळणार १.५ लाखांची सूट
या व्यतिरिक्त तुम्ही आयकर कायदा १९६१ च्या कलम 80C अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतची कर सूट घेऊ शकता. यात एलआयसी, पीपीएफसह अनेक सुविधा येतात. त्यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न फक्त ८,५०,००० इतके उरते.
इथंही मिळेल ५० हजारांची सूट
आयकर कायदा १९६१ च्या कलम 80CCD अंतर्गत NPS द्वारे कर वाचवू शकता. यामध्ये तुम्हाला ५०,००० रुपयांपर्यंत सूट मिळेल. म्हणजेच तुमचे करपात्र उत्पन्न आता फक्त ८ लाख रुपये असेल.
आणखी २ लाख रुपयांची वजावट
तुम्ही जर घर घेतलं असेल किंवा तुमच्या नावावर गृहकर्ज असेल तर तुम्हाला आयकर सवलतीचा लाभही मिळतो. आयकर कायदा 24B अंतर्गत तुम्हाला २ लाखांपर्यंत पूर्ण सूट मिळते. त्यामुळे यानुसार तुमचे करपात्र उत्पन्न केवळ ६ लाख रुपये राहील.
विमा उतरवून मिळवू शकता ७५,००० रुपयांची सूट
याशिवाय, तुम्ही आयकर कलम 80D अंतर्गत ७५,००० रुपयांचा दावा करू शकता. तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विमा घेऊ शकता. असं केल्यानं तुमचं करपात्र उत्पन्न केवळ ५ लाख २५ हजार रुपये कमी होईल.
२५,००० रुपयांची आणखी मिळवा सूट
जर तुम्ही कोणत्याही संस्थेशी संबंधित असाल तर, तुम्हाला देणगीद्वारे २५,००० रुपयांपर्यंत कर सूट देखील मिळू शकते. यामध्ये आयकर कलम 80G अंतर्गत दावा करू शकता. या सूटचा लाभ घेतल्यानंतर तुमचे करपात्र उत्पन्न फक्त ५ लाख रुपये राहते, ज्यावर तुम्हाला कोणताही कर भरावा लागणार नाही.