Join us

ITR Filling नंतरही येऊ शकते इन्कम टॅक्सची नोटीस, जाणून घ्या अशात तुम्ही काय करू शकता

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 1:58 PM

 इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यानंतरही तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते का? अशा स्थितीत काय करायला हवं? पाहूया याची उत्तरं.

सध्या अनेकांची इन्कम टॅक्स रिटर्नची (ITR Filing) लगबग सुरू आहे. ३१ जुलै २०२३ आयटीआर दाखल करण्याची अखेरची तारीख आहे. दरम्यान, ही तारीख वाढवण्यासंदर्भात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे महसूल सचिव संजय मल्होत्रा यांनीदेखील आयटीआर दाखल करण्याची तारीख वाढवण्यात येणार नसल्याचं (ITR Filing Deadline Extention) म्हटलं आहे. 

जर तुम्ही आयटीआर दाखल केला नाही तर, इन्कम टॅक्स विभागाकडून नोटीस (Income Tax Notice) येऊ शकते हे सर्वांनाच माहित आहे. परंतु जरी तुम्ही आयटीआर दाखल केला असेल तरी तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येऊ शकते हे माहितीये?  अशा परिस्थितीत नक्की काय करायला हवं. सर्वप्रथम तुम्ही घाबरू नका आणि घाबरून कोणतीही चूक करू नका. पाहूया जर नोटीस मिळाली तर तुम्ही काय करू शकता.

सर्व प्रथम, जर तुम्ही टॅक्स स्लॅबमध्ये असाल, परंतु आयटीआर भरला नाही, तर तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस मिळू शकते. दुसरीकडे, तुम्ही कमी उत्पन्न दाखवलं तरी, तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते. जर तुम्ही आयटीआर भरताना कॅलक्युलेशनमध्ये काही चूक केली असेल तर तुम्हाला नोटीस देखील मिळू शकते.

करू नका चूकआयकर विभागाच्या नोटीसपासून वाचण्यासाठी तुम्हाला योग्यरित्या आयटीआर भरणं महत्त्वाचं आहे. आयटीआर आणि फॉर्म २६ मध्ये भरलेली माहिती सारखीच असेल याची खात्री करून घ्या. बँक अकाऊंटमध्ये जमा आणि पैसे काढणं ही निश्चित मर्यादेतच ठेवा. सोबतच आयटीआरमध्ये म्युच्युअल फंडांच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीबाबत योग्य माहिती द्या.

नोटीस नीट वाचाजेव्हा इन्कम टॅक्स विभागाची नोटीस येईल तेव्हा ती तुम्ही नीट वाचा. तुम्हाला मिळालेली नोटीस किती गंभीर आहे हे जाणून घ्या. तसंच केव्हापर्यंत त्याचं उत्तर द्यायचं आहे हेदेखील पाहा. उत्तर देण्यास उशीर झाल्यास तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेकदा काही क्षुल्लक कारणासाठी नोटीस बजावली जाते, ज्याचं तुम्ही थेट स्पष्टीकरणही देऊ शकता.

अनेकदा आयकर विभाग काही गोष्टींचा तपास करत असतो, ज्यासाठी त्यांनी नोटीस पाठवलेली असू शकते. तुमच्याकडे आयकर विभागानं जी माहिती आणि कागदपत्रे मागितली आहे, त्या त्यांना पुरवा. आयकर विभाग त्याची तपासणी करेल आणि कोणतीही गडबड नसेल तर तुम्हाला कोणतीही समस्या येणार नाही. 

तज्ज्ञांचा सल्लाजर तुम्हाला इन्कम टॅक्स विभागाची नोटीस गंभीर आहे असं वाटलं आणि तुम्ही त्याचं उत्तर देऊ शकत नसाल तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घ्या. एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटचा सल्ला घ्या, जेणेकरून तुमच्यातर्फे ते आयकर विभागाला उत्तर देऊ शकतील. अनेकदा नोटीसमध्ये काही टेक्निकल बाबी असतात. त्या समजून घेण्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज पडते. अशात मनात कोणतीही शंका न ठेवता त्यांच्या सल्ल्यानं पुढचं पाऊल उचललं पाहिजे.

टॅग्स :इन्कम टॅक्स