क्रेडिट कार्डने खर्च करता आणि महिन्याचा पगार आला की त्याचे पैसे भरता, असे करत असाल तर सावधान. कारण आयकर विभागाची क्रेडिट कार्डच्या खर्चावर देखील नजर आहे. खिशात नाही पैसे तरी तुम्ही क्रेडिट कार्ड घेऊन खरेदी करू शकता. परंतू तेव्हा तुमच्या लक्षातही येत नाही की किती खर्च होतोय, आयकर विभागाने देखील यासाठी लक्ष्मण रेषा आखून दिली आहे. त्य़ापेक्षा जास्त खर्च केलात तर तुम्हाला नोटीस येणार हे नक्की.
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये ई कॉमर्स वेबसाईटवर क्रेडिट कार्डद्वारे खरेदी करणाऱ्यांची संख्या 3.7 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच चौपट वाढली आहे. एवढेच नाही तर पीओएसवर देखील क्रेडिट कार्ड स्वॅप करणाऱ्यांची संख्या १.२ टक्क्यांनी वाढली आहे. याद्वारे खरेदीदारांना खूप सोपे झाल्याचे वाटत आहे. परंतू, एका ठराविक रकमेपेक्षा जास्तीचा खर्च केला तर ते आयकर विभागालाही कळत आहे.
क्रेडिट कार्ड खरेदीबाबत आयकर विभागाकडे कोणतेही विशिष्ट नियम नसले तरी बँका आणि वित्तीय संस्थांना जास्तीच्या व्यवहारांची माहिती द्यावी लागत आहे. आयकर नियमांनुसार, बँकांना फॉर्म 61A द्वारे 10 लाखांपेक्षा जास्त व्यवहारांची माहिती द्यावी लागते. एवढेच नाही तर एखाद्या व्यक्तीच्या क्रेडिट कार्डच्या खर्चाची माहिती फॉर्म 26A च्या माध्यमातून बँकांना द्यावी लागेल.
वैयक्तिक ग्राहक किती पैसे खर्च करू शकतो, याबाबतही आयकर विभागाने सांगितले आहे. त्यापेक्षा जास्त पैसे खर्च केले तर त्याच्यावर आयकर विभागाची नजर पडते. प्रत्येक महिन्याला 1 लाख रुपयांपेक्षा जास्त क्रेडिट कार्ड बिल जमा करणाऱ्या ग्राहकांना आयकर विभागाच्या कचाट्यात यावे लागेल. एखाद्या ग्राहकाने रोखीने बिल जमा केले, तर त्याच्यावर आयकर विभागाची करडी नजर असू शकते. तसेच नोटीसही येऊ शकते.