ITR Filing 2025 : सरकारने १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केल्याने अनेक करदाते कराच्या कक्षेतून बाहेर पडले आहेत. तुम्हीही त्यापैकीच एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आपण इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नसल्याने आपल्याला आयटीआर भरण्याची गरज नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक करत आहात. कारण, नियमानुसार, सर्वांना इन्कम टॅक्स रिटर्न भरणे बंधनकारक आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची वेळ पुन्हा एकदा जवळ आली आहे. पण तुम्हाला आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख माहिती आहे का? आर्थिक वर्ष २०२४-२५ (मूल्यांकन वर्ष २०२५-२६) साठी आयटीआर दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ निश्चित करण्यात आली आहे.
अशा परिस्थितीत, हीच योग्य वेळ आहे, तुम्ही तुमच्या संपूर्ण वर्षाचे आर्थिक कागदपत्रे गोळा करायला सुरुवात करावी आणि ती वेळेवर दाखल करावी. त्याच वेळी, वित्त कायदा २०२४ नुसार, प्राप्तिकर कायद्याच्या कलम ११५ बीएसीमध्ये सुधारणा करून, नवीन कर स्लॅबला डीफॉल्ट कर व्यवस्था बनवण्यात आली आहे. पण, तुमची इच्छा असल्यास तुम्ही जुनी कर प्रणाली निवडू शकता.
रिटर्न भरताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
काही लोकांना आयटीआर भरणे किटकट वाटू शकते. विशेषतः ज्यांच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत किंवा जे पहिल्यांदाच रिटर्न भरत आहेत. जर तुम्ही खाली दिलेल्या चुका टाळल्या तर रिटर्न भरणे तुमच्यासाठी खूप सोपे होऊ शकते.
जुन्या आणि नवीन दोन्ही कर प्रणालींमध्ये वेगवेगळे कर सवलती आणि दर उपलब्ध आहेत. सर्वप्रथम तुम्हाला कोणता करप्रणाली तुमच्यासाठी फायदेशीर आहे हे ठरवावे लागेल. प्रत्येक व्यक्तीसाठी कर कपातीची श्रेणी वेगळी असू शकते. कलम ८०सी, ८०डी सारख्या सवलतींचा लाभ घेण्यासाठी, तुम्ही कोणत्या विविध कपातींचा दावा करू शकता ते तपासा.
रिफंड येण्यास उशीर होईल
जर तुम्ही नाव, पत्ता, बँक खाते, पॅन कार्ड यासारखी चुकीची माहिती भरली तर तुमचे रिटर्न नाकारले जाऊ शकते किंवा रिफंडला विलंब होऊ शकतो. म्हणून, ते भरताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. एवढेच नाही तर, जर तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत असतील तर ते योग्यरित्या समाविष्ट करायला विसरू नका.
वाचा - टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
फॉर्म २६एएस तपासा
तुम्हाला हा फॉर्म आयकर पोर्टलवर सहज मिळेल. त्यात तुमचा टीडीएस, कर भरणा आणि इतर अनेक माहिती असते. तुम्ही दिलेली माहिती फॉर्म २६एएस शी जुळते की नाही हे तपासणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.