ED Action on Mumbai Builder : सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने मुंबईत ४०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. शहरातील प्रसिद्ध बिल्डर ललित टेकचंदानी आणि त्याच्या साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत त्याच्या अनेक मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश जारी केला आहे. यामध्ये दुबईतील एक व्हिला, मुंबईतील अनेक निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प, अनेक स्थावर आणि जंगम मालमत्ता, जमिनीचे पार्सल आणि पुण्यातील मुदत ठेवी यांचा समावेश आहे.
गृह खरेदीदारांची फसवणूक
फ्लॅट खरेदीदारांची ४०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टेकचंदानी आणि त्याच्या १५ सहकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेकचंदानीने घर खरेदीदारांकडून घेतलेले पैशाचा वापर स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला. आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणात, ईडीने यापूर्वी शेअर्स, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेवींमधील १५८ कोटी रुपयांची गुंतवणूक जप्त केली होती.
१७,०० हून अधिक लोकांची फसवणूक
ईडीच्या तपासानुसार, टेकचंदानीने एका गृहनिर्माण प्रकल्पासाठी १,७०० हून अधिक गृहखरेदीदारांकडून ४०० कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली. नंतर खरेदीदारांना ना फ्लॅट मिळाले ना रिफंड मिळाला. घर खरेदीदारांकडून घेतलेल्या पैशाचा वापर वेगवेगळ्या नावाने मालमत्ता खरेदी करण्यासाठी केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. यामध्ये टेकचंदानी याच्या कुटुंबीयांच्या नावाचाही समावेश आहे.
टेकचंदानी यांना मार्च २०२४ मध्ये अटक करण्यात आली होती
ईडीने भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) विविध कलमांतर्गत तळोजा आणि चेंबूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या २ एफआयआरच्या आधारे हा तपास सुरू केला होता. एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की टेकचंदानी आणि इतर अनेकांनी मेसर्स सुप्रीम कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडच्या तळोजा, नवी मुंबई येथील गृहनिर्माण प्रकल्पासाठी घर खरेदीदारांकडून पैसे घेतले होते. ललित टेकचंदानी याला मार्च 2024 मध्ये अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.