Join us  

Income Tax Return दाखल केला नाही? पुढे काय? जाणून घ्या आता काय करू शकता?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2024 3:11 PM

Income Tax Return दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना हाेती. मात्र, सरकारने काेणतीही मुदतवाढ दिली नाही. जर तुम्ही ते भरलं नसेल तर पुढे काय करावं लागेल, पाहूया

आयकर विवरण (Income Tax Return) दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल, अशी अपेक्षा अनेकांना हाेती. मात्र, सरकारने काेणतीही मुदतवाढ दिली नाही. ३१ जुलै राेजी ५० लाखांपेक्षा जास्त विवरण दाखल करण्यात आले. आतापर्यंत ७ काेटींपेक्षा जास्त विवरण दाखल झाले असून, उशिरा विवरण दाखल करणाऱ्यांना दंड आणि थकीत करावर दरमहा १ टक्के दराने व्याज भरावे लागणार आहे. 

आयकर खात्याच्या संकेतस्थळावर विवरण दाखल करताना अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या हाेत्या. त्यामुळे मुदत वाढवून देण्याची मागणी करण्यात येत हाेती. ३१ जुलैपर्यंत आयकर विवरण दाखल न करणाऱ्यांना पुढे काय करावे, असा प्रश्न आहे. ज्यांनी विवरण दाखल केलेले नाही, असे करदाते अजूनही विवरण दाखल करू शकतात. व्यावसायिक करदात्यांचे विलंबामुळे नुकसान आहे. ते व्यावसायिक नुकसान आता कॅरी फाॅरवर्ड करू शकत नाहीत.

६.७७ काेटी आयकर विवरण आकलन वर्ष २०२३-२४ साठी दाखल झाले हाेते. ७ काेटींपेक्षा जास्त विवरण आकलन वर्ष २०२४-२५ साठी आतापर्यंत दाखल झाले आहेत. ६४.३३ लाख विवरण ३१ जुलै २०२३ राेजी दाखल झाले हाेते.

आता पर्याय काय?

३१ डिसेंबर २०२४ पर्यंत दंड भरून विवरण दाखल करण्याचा पर्याय आहे. ५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना १ हजार रुपयांचा दंड. ५ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना ५ हजार रुपयांचा दंड. १ टक्के दरमहा व्याज थकीत करावर माेजावे लागेल.

टॅग्स :इन्कम टॅक्स