Petrol-Diesel Price Cut: वाढत्या इंधन दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या सामान्यांसाठी आता एक चांगली बातमी आली आहे. विदेशी बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या या बदलामुळे देशातील सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याच्या आशा पल्लवित होत आहेत. कच्च्या तेलाच्या किमती अनेक वर्षांतील नीचांकी पातळीवर गेल्याने पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे.
3 वर्षात पहिल्यांदाच किंमत 70 डॉलरच्या खाली
मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 70 डॉलरच्या खाली गेली. डिसेंबर 2021 नंतर पहिल्यांदाच कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली असल्याचे एएफपीच्या अहवालात म्हटले आहे. आर्थिक वाढ मंदावल्याबद्दल जगभरात चिंता वाढली आहे. याचा परिणाम तेलाच्या भावावर होत असल्याचे मत एएफपीने मांडलं आहे.
कच्च्या तेलात मंगळवारी मोठी घसरण
मंगळवारी ब्रेंट क्रूडची किंमत 3.7 टक्क्यांनी घसरून 69.15 डॉलर प्रति बॅरल झाली. त्याच वेळी, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत 4.1 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 65.90 डॉलर इतकी झाली होती. कच्च्या तेलाची ही जवळपास 3 वर्षांतील नीचांकी पातळी आहे. त्यामुळे सरकारी तेल कंपन्यांनी डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ किमती कमी करण्याचा विचार करावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे. इंधनदर कमी झाले तर सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सहा महिन्यांपूर्वी दरकपात
देशात इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियम या 3 सरकारी तेल कंपन्या रिटेलमध्ये पेट्रोल आणि डिझेलची विक्री करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीनुसार तिन्ही कंपन्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतीत बदल करत असतात. जवळपास 6 महिन्यांपासून डिझेल आणि पेट्रोलच्या किरकोळ दरात कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी 14 मार्च 2024 रोजी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करण्यात आली होती.
महाराष्ट्रासह अनेक राज्यात निवडणुकांचे वारे
अनेकदा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून पेट्रोल-डिझेलच्या किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मार्च 2024 मध्ये देशात लोकसभा निवडणुकांच्या आधी इंधनदरात कपात करण्यात आली होती. त्यानंतर आता अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे सरकार पुन्हा एकदा जनतेला दिलासा देऊ शकेल, अशी अपेक्षा आहे. सध्या दिल्लीत पेट्रोल 94.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 87.62 रुपये प्रति लीटर आहे. तर मुंबईत पेट्रोल 103.44 रुपये आणि डिझेल 89.97 रुपये प्रति लिटर आहे
कच्चा तेलात गेल्या आठवड्यापासून मोठी घसरण
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. गेल्या आठवड्यात ब्रेंट क्रूडची किंमत सुमारे 8 टक्क्यांनी घसरली होती, तर वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत सुमारे 6 टक्क्यांनी घसरली होती. या आठवड्यातही कच्च्या तेलाच्या किमतीत घसरणीचा कल कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता कच्चे तेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास होळीनंतर दसरा-दिवाळीपूर्वी डिझेल आणि पेट्रोलच्या दरात आणखी कपात होण्याची दाट शक्यता आहे.