अजित जोशी,
चार्टर्ड अकाउंटंट
प्रश्न : मी ५५ हजार रुपये घरभाडे देतो. मी नोकरदार आहे. तरी मला टीडीएस करावा लागेल का?
उत्तर : पैसे देताना काही टक्के कापून ते ज्याला दिले त्याच्या नावाने सरकारला भरायचे, म्हणजे टीडीएस! सहसा टीडीएस करायची जबाबदारी कंपन्या, ट्रस्ट, भागीदारी किंवा ज्यांचा उद्योग-व्यवसायाची उलाढाल खूप आहे, अशा
लोकांवर असते. मात्र, दोन बाबतीत ती सर्वसामान्य व्यक्तींवरही येते, अगदी ते अन्यथा करदाते नसले तरी.
एकतर जेव्हा ते ५० लाखांहून अधिक किमतीचे घर घेतात तेव्हा किंवा मग जर तुम्ही महिना ५० हजारांहून अधिक भाडे देत असाल तर. अशा वेळेला तुम्हाला शेवटच्या महिन्यात ५ टक्के टीडीएस करायला हवा. म्हणजे समजा, तुम्ही ऑगस्टपासून रुपये ५५,००० भाडे देत आहात, तर आठ महिन्यांचे भाडे होईल ४ लाख ४० हजार आणि त्यावर ५ टक्क्यांनी टीडीएस असेल रुपये २२ हजार. तेव्हा मार्च महिन्यात भाडे देताना तुम्ही २२ हजार कापून ३३ हजार घर मालकाला द्यायचे. पण समजा, तुम्ही ६ महिन्यांनी जानेवारीतच घर सोडणार असाल, तर मात्र ५५ हजार गुणिले ६, म्हणजे ३ लाख ३० हजार वर १६,५०० रुपये शेवटच्या महिन्यात कापून ३८,५०० द्यावे लागतील.
प्रश्न : या महिन्यात कर वाचविण्यासाठी काय करावं?
उत्तर : ८० सी मध्ये १,५०,००० ची मर्यादा आहे. मुलांची फी, पीएफ, विमा हप्ता वगैरे धरून जर तुम्ही याच्या आत असाल, तर ती गॅप भरून काढा. त्याचप्रमाणे आरोग्य विम्यावर २५ हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकही त्यात कव्हर होत असतील तर अजून अधिकची मर्यादा आहे.
आतापर्यंत केलेला टीडीएस किमान डिसेंबरपर्यंत सरकारला जमा झालेला आहे ना, हे पाहून घ्या आणि त्याच्या हिशेबात काही कमी-जास्त असल्यास त्यानुसार टीसीएसमध्ये बदल करून घ्या. त्याचप्रमाणे तुम्हाला पगाराव्यतिरिक्त जे उत्पन्न असेल ते एम्प्लॉयरला दाखविले नसेल तर त्यावर ॲडव्हान्स टॅक्स येतो. तो न भरल्यास अकारण व्याज पडते. जे छोट्यामोठ्या व्यवसायात आहेत, त्यांच्यासाठी ॲडव्हान्स टॅक्स अधिकच महत्त्वाचा आहे. एकूणच रिटर्न भरायला ३१ जुलैची मर्यादा असली तरी आताच सुसज्ज तयारी ठेवा.
आरोग्य विमा आधुनिक काळात अत्यावश्यक आहे. त्यामुळे तिथेही गरज पडत असल्यास हप्ता भरून टाका. एम्प्लॉयरकडून मिळणाऱ्या काही भत्त्यांवर तुम्ही खर्च कराल तेवढी सूट करातून आहे, त्यामुळे असे खर्च योग्य तेवढे झाले आणि एचआरला कळविले का, हे पाहून घ्या.