- उमेश शर्मा
(चार्टर्ड अकाउंटंट)
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, आज बालदिवस! काही खास सांगशील का?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि संगोपनावर पैसा खर्च करतात, या खर्चावर पालकांना आयकरात वजावट मिळू शकते. कर कायद्यांतर्गत हे फायदे खालीलप्रमाणे :-
१. पालकांनी त्यांच्या मुलांसाठी भरलेल्या ट्यूशन फीवर कलम ८०सी अंतर्गत १,५०,००० रुपयांपर्यंत वजावट उपलब्ध आहे.
२. पगारदार करदात्यांना प्रति महिना १०० रुपये (२ मुलांपर्यंत) शिक्षणासाठी सूट आहे.
३. पगारदार करदात्यांना प्रति महिना ३०० रुपये प्रति बालक (२ मुलांपर्यंत) होस्टेल भत्त्यासाठी सूट आहे.
४. उच्च शिक्षणासाठी घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याजावर कलम ८०ई अंतर्गत वजावट मिळते.
अर्जुन : मुलींसाठी काही विशेष फायदे आहेत का?
कृष्ण : मुलींसाठीच्या “सुकन्या समृध्दी योजने”त मुलीच्या नावावर तिच्या पालकांकडून ठेवी ठेवता येतात. ठेवी प्रति महिना २५० रुपये ते १,५०,००० रुपये प्रति वर्ष असू शकतात. या ठेवी आयकराच्या कलम ८०सी अंतर्गत कपातीसाठी पात्र आहेत. यावर मिळणारे व्याज करमुक्त आहे. मॅच्युरिटी किंवा योजनेतून पैसे काढण्यावर कोणताही कर लागणार नाही.
अर्जुन : अल्पवयीन मुलांनी उत्पन्न मिळवले तर?
कृष्ण : १. अल्पवयीन मुलाचे उत्पन्न पालकांच्या उत्पन्नात एकत्रित केले जाईल. पालक १५०० रुपये किंवा अल्पवयीन मुलाचे उत्पन्न यापैकी जे कमी असेल, त्याचा सूट म्हणून दावा करून शकतात.
२. मात्र, मुलाने/मुलीने काम करून कौशल्य, ज्ञान, प्रतिभा, अनुभव आदींचा वापर करून उत्पन्न मिळवले असेल, तर उत्पन्न त्याच्या/तिच्या पालकांच्या उत्पन्नात समाविष्ट केले जाणार नाही. एखाद्या अल्पवयीन मुलाने गायन स्पर्धेत बक्षीस म्हणून १० लाख रुपये कमावले, तर त्यावर थेट कर आकारला जाईल.
अर्जुन : कृष्णा, यातून करदात्याने काय बोध घ्यावा?
कृष्ण : पालक आपल्या मुलांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपली कमाई खर्च करतात. या खर्चावर मिळणाऱ्या वजावटींचा फायदा पालकांनी अवश्य घेतला पाहिजे.
Tax: मुलांवर खर्च; आयकरात वजावट घ्या!
Tax : पालक आपल्या मुलांच्या शिक्षणावर आणि संगोपनावर पैसा खर्च करतात, या खर्चावर पालकांना आयकरात वजावट मिळू शकते. कर कायद्यांतर्गत हे फायदे खालीलप्रमाणे आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:19 AM2022-11-14T06:19:57+5:302022-11-14T06:21:24+5:30