अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, भारतात होळीचा सण आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. या निमित्ताने जीएसटीमध्ये सरकारने कोणते नवे रंग आणले आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, सरकारने जीएसटीमध्ये विविध रंग मिसळून ‘कभी खुशी कभी गम’ असे चित्र निर्माण केले आहे.
अर्जुन : आनंद देणारा गुलाबी रंग यात आहे का?
कृष्ण : ४९ व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत प्रस्तावित केलेली जीएसटी ॲम्नेस्टी योजना पुढील करदात्यांसाठी उपलब्ध असेल -
१. जीएसटी नंबर पुन्हा चालू करण्यासाठी अर्ज केला गेला नाही अशा प्रकरणांमध्ये. २. असेसमेंट झाले आहे. परंतु ३० दिवसांच्या आत रिटर्न भरले गेले नाही अशा प्रकरणांसाठी. ३. फॉर्म जीएसटीआर-०४, जीएसटीआर-०९, जीएसटीआर-१० मध्ये प्रलंबित रिटर्न भरण्यासाठी सशर्त माफी/विलंब शुल्क कमी करण्यासंदर्भात ॲम्नेस्टी योजना आणण्याचा प्रस्ताव आहे.
अर्जुन : आयकर दात्यांसाठी पिवळा सिग्नल आहे का?
कृष्ण : पिवळा हा आनंद, मन आणि बुद्धीचा रंग आहे. करदात्यांनी नव्या आणि जुन्या करप्रणालीची चिकित्सा करून योग्य पर्याय निवडला पाहिजे. नवीन योजनेत कराचा दर कमी आहे. परंतु, जुन्या योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या गृहकर्जावरील व्याज, एलआयसी प्रीमियम पेड, पीपीएफ योगदान अशा विविध कपातींचा लाभ त्यात होत नाही.
अर्जुन : लाल रंगाचा धोका कुठे आहे?
कृष्ण : आता पुरवठादारांना विहीत वेळेत एमएसएमईचे पेमेंट करणे बंधनकारक आहे. सरकारने कलम ४३बी मध्ये नवे कलम जोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. MSMED कायद्यात निर्दिष्ट वेळेत पेमेंट केल्यास MSME ला पेमेंट कपातीची अनुमती देईल. धर्मादाय व धार्मिक न्यासांना लागू असलेल्या तरतुदींच्या संदर्भात अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. सरकार ट्रस्ट क्षेत्रासाठी नवीन नियम लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण या क्षेत्रात अधिक करचोरी होत आहे.
अर्जुन : कृष्णा, करदात्याला बहुरंगी जीएसटी आणि प्राप्तिकरातून काय शिकता येईल?
कृष्ण : आयकर आणि जीएसटीमध्ये करदात्याने खरे उत्पन्न दाखवून त्यानुसार कर रिटर्न भरावे आणि पांढऱ्या रंगाप्रमाणे शुद्ध रहावे, हे बरे!