आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ जुलैपर्यंत आहे. बहुतांश करदाते मुदतीपूर्वी आयटीआर दाखल करण्यात व्यस्त आहेत. आयकर विभागाकडून कोणत्याही प्रकारची नोटीस येऊ नये यासाठी आयटीआर भरण्यापूर्वी अनेक तांत्रिक बाबींची काळजी घेणे गरजेचे असते. याप्रक्रियेत ‘फॉर्म २६ एएस’ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आयटीआर फाइल करण्यासाठी हा फॉर्म आयकर विभागाकडून जारी केला जातो.
म्हणून हा फॉर्म आहे इतका महत्त्वाचा?
- याला टॅक्स क्रेडिट स्टेटमेंट फॉर्म, असेही म्हणतात. यात करदात्याची करासंबंधित बहुतांश माहिती असते.
- करदात्याचे उत्पन्न, खर्च, कंपनी, बँक तपशील तसेच स्थावर मालमत्तेची माहितीही यात दिलेली असते.
- म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची माहिती या फॉर्मद्वारे कळू शकते.
- याच्या मदतीने तुम्हाला नेमका किती कर द्यायचा आहे, याची गणना करता येते.
- यात स्रोतावरील कर कपात (टीडीएस) आणि आगाऊ कर याची माहिती असते.
- फॉर्ममध्ये आयकर परतावा आणि स्थावर मालमत्तेच्या विक्रीवर कापलेल्या कराचा तपशील असतो.
- फॉर्मद्वारे किती कर भरला हे सिद्ध करता येते. कर वेळेवर सरकारकडे जमा झाला की नाही हे यावर तपासता येते.
कोठून, कसा डाउनलोड करावा?
- घरबसल्या फॉर्म २६ एएस डाउनलोड करू शकता. यासाठी https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी. यूजर आयडी, पॅन कार्ड, नाव, पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावे.
- ई-फाइल टॅबमध्ये ‘व्ह्यू फॉर्म २६एएस (टॅक्स क्रेडिट)’ वर क्लिक करा. टीडीएस-सीपीएस पोर्टलमध्ये सहमती दर्शवून ‘प्रोसिड’ वर क्लिक करा.
- व्ह्यू टॅक्स क्रेडिट (२६एएस/ॲन्युअल टॅक्स स्टेटमेंट) वर क्लिक करा. वर्ष निवडल्यानंतर ‘व्ह्यू/डाऊनलोड’वर क्लिक करावे. डाऊनलोड करण्यासाठी ‘व्ह्यू ॲजमध्ये एचटीएमएल’ निवडून ‘एक्स्पोर्ट ॲज पीडीएफ’वर क्लिक करावे.