आयटीआर दाखल करण्याची वेळ जवळ येत आहे. अनेकदा लोक TDS आणि TCS बद्दल गोंधळलेले दिसतात. या दोन्हीमधला फरक अनेकांना कळत नाही. या कर वसूल करण्याच्या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत. TDS म्हणजे टॅक्स डिडक्शन अॅट सोर्स तर TCS म्हणजे टॅक्स कलेक्शन ॲट सोर्स. दोन्हीमध्ये, कराचा भाग पैशाच्या व्यवहाराच्या वेळी कापला जातो. हा पैसा सरकारकडे जमा केला जातो. पण, दोन्हीमध्ये कर भरण्याच्या पद्धतीत फरक आहे. नव्या व्यक्तीला हा फरक समजणं सोपं नाही. या दोन्ही प्रकरणांमध्ये रिटर्न भरणं आवश्यक आहे. आपण येथे याबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊ.
टीडीएस म्हणजे काय?
एखाद्या व्यक्तीचं कोणतं उत्पन्न असेल आणि त्या उत्पन्नातून कर वजा करून उर्वरित रक्कम दिली जाते. अशा प्रकारे, कर म्हणून कापलेल्या रकमेला TDS म्हणतात. सरकार टीडीएसच्या माध्यमातून कर वसूल करते. वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांतून ते कापले जाते. यामध्ये पगार, व्याज आणि गुंतवणुकीवर मिळणारे कमिशन इत्यादींचा समावेश आहे. पैसे भरणारी संस्था टीडीएस म्हणून ठराविक रक्कम कापते. सरकार प्रत्येक आर्थिक वर्षापूर्वी कोणत्या प्रकारच्या पेमेंटवर किती टीडीएस कापला जाईल याची घोषणा करते. उत्पन्नाच्या स्रोतावर कर कापल्यामुळे त्याला डिडक्शन ॲट द सोर्स म्हणजेच TDS असं म्हणतात. कर कपात करणार्या व्यक्तीला डिडक्टर म्हणतात आणि ज्या व्यक्तीचा TDS कापला जातो त्याला डिडक्टी म्हणतात.
उदाहरणार्थ तुम्हाला जर १० लाखांची लॉटरी लागली, तर तुम्हाला जिंकलेल्या रकमवेर ३० टक्के टीडीएस कापण्याचा नियम आहे. म्हणजेच १० लाखांच्या रकमेवर ३० टक्के रक्कम कापून उर्वरित रक्मक तुम्हाला दिले जातील. ३ लाख रूपये टीडीएसच्या स्वरूपात कापले जातील आणि तुम्हाला सात लाखांची रक्कम मिळेल.
टीसीएस म्हणजे काय?
TCS टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्स असतो. म्हणजेच सोर्सवरील एकत्रित कर. हा कर विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यवहारावर लावला जातो. खरेदीदाराकडून TCS गोळा करून ते सरकारकडे जमा करण्याची जबाबदारी मालाची विक्री करणाऱ्या व्यक्तीची असते. म्हणजे ती विक्रेत्याची जबाबदारी आहे. आयकर कायद्याच्या कलम 206C (1) नुसार, व्यावसायिक कारणांसाठी काही वस्तूंच्या विक्रीवरच TCS कापण्याचा नियम आहे. व्यक्तीगत उपभोगासाठी हा व्यवहार असल्यास हा कर आकारला जात नाही.