अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, दिवाळीचा सण जवळ आला आहे. व्यापारी बाजारपेठेत व्यस्त आहेत. जुन्या हिशोबाची पुस्तके (अकाऊंट्स बुक्स) सांभाळण्यासंदर्भात आयकर कायद्यांतर्गत काय तरतूद आहे?
कृष्ण (काल्पनिक पात्र) : अर्जुना, आयकर कायद्यांतर्गत पुस्तके खरेदी व विक्रीची बिले, बँकखाते इत्यादी आठ वर्षे सांभाळावी लागतात. तसेच इतर कोणत्याही व्यक्ती व व्यापाऱ्याची वार्षिक उलाढाल २५ लाखांपेक्षा जास्त किंवा वार्षिक उत्पन्न २५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांनाही हिशोबाची पुस्तके ठेवणे गरजेचे आहे. हिशोबाची पुस्तके ठेवली नाहीत तर आयकर खाते त्यांना २५ हजार रुपयांचा दंड लावू शकते. तसेच अंदाजित उत्पन्न धरून कर आकारू शकते.
अर्जुन : कृष्णा, हिशोबाची पुस्तके ठेवण्यासाठी जीएसटी कायद्यांतर्गत काय तरतूद आहे?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक नोंदणीकृत व्यक्तिला त्या वर्षीच्या वार्षिक रिटर्न भरण्याच्या शेवटच्या तारखेपासून सहा वर्षांच्या कालावधीसाठी व्यवसायाच्या मुख्य ठिकाणी जीएसटीचे रेकॉर्ड ठेवणे आवश्यक आहे. जर करदाता खाती पुस्तके ठेवण्यास अपयशी ठरले तर दहा हजार रुपये दंड किंवा जेवढा कर भरला नाही तेवढी रक्कम भरण्यास जबाबदार असेल.
अर्जुन : कृष्णा, हिशोबाची पुस्तके ठेवण्यासाठी कंपनी कायद्यांतर्गत काय तरतूद आहे?
कृष्ण : अर्जुना, प्रत्येक कंपनीने संबंधीत वर्षाच्या समाप्तीपासून आठ वर्षांपर्यंत खाते पुस्तके सांभाळून न ठेवल्यास कंपनीच्या व्यवस्थापकाला किंवा अन्य जबाबदार व्यक्तिला एक वर्षाचा तुरुंगवास किंवा पन्नास हजार रुपयांपर्यंत दंड लागू केला जाईल. त्यात पाच लाखापर्यंत वाढ होऊ शकते.
अर्जुन : कृष्णा, आजकाल कॉम्प्युटर, सॉफ्टवेअरमध्येच हिशोब ठेवला जातो, मग त्याचे काय?
कृष्ण : अर्जुना, हिशोब जरी कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये ठेवला असला तरी त्याची प्रिंटआऊट सांभाळून ठेवणे गरजेचे आहे. आयकर कायद्यानुसार कॉम्प्युटरमध्ये ठेवलेला डाटा, अथवा पेन - ड्राईव्ह, सीडी इत्यादी उपकरणांवर साठवून ठेवलेली माहितीसुध्दा पुस्तकांच्या परिभाषेत मोडते. अधिकारी त्या उपकरणांची तपासणी करू शकतात.