Pan Card Surrender: आधारप्रमाणेच पॅन कार्डही एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. बँक खातं उघडण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापर्यंत याची गरज असते. पण पॅन कार्डमध्ये काही चूक झाली किंवा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर तुम्ही काय कराल? अशावेळी तुम्ही पॅन कार्ड सरंडर करू शकता. जाणून घेऊ कोणत्या परिस्थितीत तुम्ही पॅन कार्ड सरंडर करू शकता आणि ते सरंडर करण्याचा मार्ग काय आहे.
पॅन कार्ड कधी सरंडर करणं आवश्यक आहे?
- जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील.
- पॅन कार्ड हरवलं असेल.
- जर तुमचं पॅन कार्ड आयकर विभागानं निष्क्रिय केलं असेल.
- जर तुमचं पॅन कार्ड चुकीच्या माहितीसह जारी केलं गेलं असेल.
- जर तुमचं पॅन कार्ड एखाद्या कंपनीचं किंवा फर्मचं असेल आणि ती बंद झाली असेल.
- जर पॅनकार्ड असेल आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर.
- जर तुम्ही भारताबाहेर शिफ्ट होत असाल तर.
... तर होऊ शकते कारवाई
जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असतील तर तुम्ही त्यातील एक कार्ड वेळेत सबमिट करावं कारण आयकर विभागाला याची माहिती मिळाली तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आयकर विभागाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे दोन पॅनकार्ड असतील तर त्याला १० हजार रुपये दंड किंवा कमीत कमी ६ महिन्यांची शिक्षा होऊ शकते किंवा शिक्षा आणि दंड दोन्हीही होऊ शकतो.
दोन पॅन कार्ड असतील तर सरंडर कसं करावं?
- तुम्ही तुमचं पॅन कार्ड ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे सरंडर करू शकता. ऑनलाइन सरंडर करण्यासाठी तुम्हाला एनएसडीएलच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- त्यानंतर, Application Type ड्रॉप-डाउनमधून, Changes or Correction in existing PAN Data/Reprint of PAN Card (No changes in existing PAN Data) पर्याय निवडा.
- फॉर्म भरून सबमिट करा. फॉर्म सबमिट केल्यानंतर तुमची रिक्वेस्ट रजिस्टर केली जाईल. यानंतर तुम्हाला ईमेल आयडीवर एक टोकन नंबर पाठवला जाईल.
- टोकन नंबर नोट करा आणि खाली दिलेल्या Continue with PAN Application Form वर क्लिक करून प्रक्रिया सुरू ठेवा. आता एक नवीन वेबपेज ओपन होईल. या ठिकाणी Submit scanned images through e-Sign चा पर्याय निवडा.
- पेजच्या खालच्या डाव्या बाजूला तुम्हाला तुमच्याकडे ठेवू इच्छिणाऱ्या पॅन कार्डचा तपशील भरावा लागेल. विनंती केलेली माहिती भरा, त्यानंतर नेक्स्टचा पर्याय निवडा.
- त्यानंतर मागितलेली कागदपत्रं जसा फोटो, स्वाक्षरी, पत्ता, ओळखपत्र आदी अपलोड करा. जेथे आवश्यक असेल तेथे पैसे भरा. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला डाऊनलोड करण्याची पावती दिसेल. ती डाऊनलोड करा.
- आता पावतीची कॉपी, दोन फोटो आणि इतर आवश्यक कागदपत्रांसह एनएसडीएल कार्यालयात पाठवा. पावती पाठवण्यापूर्वी लिफाफ्याला पॅन रद्द करण्यासाठी अर्ज आणि पावती क्रमांकासह लेबल करा.