इन्कम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) भरल्यानंतर आता करदाते परताव्याच्या प्रतीक्षेत आहेत. आयकर विभाग सर्वप्रथम आयटीआरवर प्रोसेस करतो. त्याला काही कमतरता आढळल्यास तो करदात्यांना प्रश्न विचारू शकतो. आयटीआरमध्ये काही कमतरता आढळली नाही तर तो त्यावर प्रोसेस करतो. ही माहिती करदात्यांना ईमेलद्वारे पाठविली जाते. विभागानं आयटीआरवर प्रोसेस करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या आयटीआरवर प्रोसेस करण्यात आली आहे, त्याची माहिती करदात्यांना देण्यात आली आहे. अनेक करदात्यांना परतावाही मिळाला आहे. तुम्हालाही परताव्याचे पैसे मिळाले आहेत का?
आयकर विभाग पाठवत आहे मेसेज
आयकर विभाग एसएमएसद्वारे परताव्याची (Income Tax Refund) माहिती देत आहे. म्हणूनच तुम्ही एकदा तुमचा एसएमएस चेक केला पाहिजे. तसा मेसेज नसेल तर तुमचा ईमेल चेक करावा. त्यानंतर बँक खात्यातील शिल्लक तपासावी. जर तुमचा परतावा आला नसेल तर तुम्ही इन्कम टॅक्स विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करून रिफंडची स्थिती पाहू शकता.
ई-फायलिंग पोर्टलवर पाहा स्टेटस
तुम्ही तुमच्या युझरनेम आणि पासवर्डच्या मदतीने ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करू शकता. त्यानंतर तुम्हाला 'व्ह्यू रिटर्न्स/फॉर्म्स' या पर्यायावर जावं लागेल. त्यानंतर 'इन्कम टॅक्स रिटर्न'ची निवड करावी लागेल. स्टेटस पाहण्यासाठी अॅक्नॉलेजमेंट नंबरवर क्लिक करा. इथे तुम्हाला तुमच्या रिटर्नवर प्रोसेस करण्यात आली आहे का नाही याची माहिती मिळेल. रिटर्नबाबत तुम्हाला काही समस्या असेल तर तेही कळेल. 'नो डिमांड नो रिफंड विथ प्रोसेस्ड प्रोसेस' असं लिहिलं असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या परताव्यावर प्रोसेस झाली आहे, पण तुमचा कोणताही परतावा नाही.
बँक खात्याचा तपशील तपासा
अनेकदा बँक खात्याचा योग्य तपशील नसल्यामुळे परतावा मिळण्यास उशीर होतो. त्यामुळे करदात्यांनी आयटीआरमध्ये दिलेल्या बँक खात्याचा तपशील योग्य आहे की नाही हे तपासून पाहावं. आयकर विभाग परताव्याचे पैसे केवळ प्री-व्हॅलिडेट बँक खात्यात पाठवतो. आयटीआरमधील कोणत्याही त्रुटीमुळे तुमचा परतावाही अडकू शकतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जर असं असेल तर तुम्ही आयकर कायदा १९६१ च्या कलम १३९ (५) अंतर्गत सुधारित रिटर्न दाखल करू शकता.
नोटीस आली असेल तर त्याला उत्तर द्या
आयकर विभाग काही करदात्यांना नोटिसा पाठवतो. आयटीआरशी संबंधित काही प्रश्न असू शकतात. तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस पाठवण्यात आली आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या ईमेल आयडी आणि ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन करावं लागेल. जर तुम्हाला नोटीस पाठवण्यात आली असेल तर तुम्हाला कलम १४३ (१) अंतर्गत पाठवलेल्या नोटिसीला उत्तर द्यावे लागेल.