yuzvendra dhanashree divorce : क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि कोरिओग्राफर धनश्री वर्मा यांच्या घटस्फोटाच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. दोघांनी परस्पर संमतीने वेगळं होण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने वांद्रे कौटुंबिक न्यायालयाला २० मार्चपर्यंत म्हणजेच आजपर्यंत घटस्फोट देण्याचे निर्देश दिले आहेत. दोघेही जून २०२२ पासून विभक्त राहत असल्यामुळे न्यायालयाने अनिवार्य ६ महिन्यांचा कूलिंग-ऑफ कालावधी माफ केला आहे. करारानुसार, चहल धनश्री वर्माला ४.७५ कोटी रुपये पोटगी (घटस्फोटानंतर दिली जाणारी रक्कम) देईल. त्याने यापूर्वीच २.३७ कोटी रुपये ट्रान्सफर केले आहेत. उर्वरित रक्कम घटस्फोटानंतर दिली जाईल. दरम्यान, पोटगीच्या रकमेवर टॅक्स आकारला जातो का? असा प्रश्न विचारला जात आहे.
भारतात पोटगी कशी ठरवली जाते?
पोटगी ही कायदेशीर जबाबदारी आहे. या अंतर्गत घटस्फोट किंवा विभक्त झाल्यानंतर पती किंवा पत्नीने एकमेकांना देखभाल खर्च द्यावा लागतो. पोटगीची रक्कम ठरवताना, न्यायालय अनेक गोष्टींचा विचार करते. यामध्ये दोन्ही पक्षांची आर्थिक परिस्थिती, जीवनशैली, गरजा आणि इतर अनेक घटक यांचा समावेश होतो. देशात पोटगीचा निर्णय अनेक कायद्यांद्वारे केला जातो. यामध्ये हिंदू विवाह कायदा, विशेष विवाह कायदा, भारतीय घटस्फोट कायदा, मुस्लिम महिला कायदा आणि पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा यांचा समावेश आहे.
पोटगीवर टॅक्स लागू होतो का?
पोटगी करपात्र आहे की नाही हे पोटगी कशाप्रकारे दिली जाते यावर अवलंबून आहे. जर पोटगी एकाच वेळी दिली गेली असेल, तर त्यावर कोणताही टॅक्स लागत नाही. प्राप्तिकर कायद्यानुसार याला 'कॅपिटल रिसिप्ट' म्हणतात आणि त्यावर कर लागत नाही. जर पोटगी नियमितपणे (उदा. मासिक किंवा वार्षिक) दिली जात असेल, तर ती करपात्र असते. प्राप्तिकर कायद्यानुसार याला 'रिव्हेन्यू रिसिप्ट' म्हणतात आणि त्यावर कर लागू होतो. याचा अर्थ असा की जर तुम्हाला दर महिन्याला किंवा दरवर्षी पोटगी मिळाली तर ती करपात्र असेल. प्राप्तकर्त्याने ही देयके त्याच्या आयकर रिटर्नमध्ये घोषित करणे आवश्यक आहे. तुमच्या लागू असलेल्या आयकर स्लॅबनुसार यावर कर भरावा लागतो.
मालमत्ता हस्तांतरणाद्वारे पोटगीवर कर आकारला जातो. घटस्फोटापूर्वी मालमत्ता हस्तांतरित केल्यास त्यांना नातेवाईकांकडून भेटवस्तू म्हणून करातून सूट मिळू शकते. घटस्फोटानंतर हस्तांतरण झाल्यास, प्राप्तकर्त्याला मालमत्तेवर कर भरावा लागतो. याचा अर्थ घटस्फोटापूर्वी मालमत्ता मिळाल्यास त्यावर कर आकारला जाणार नाही. परंतु, घटस्फोटानंतर मालमत्ता मिळाल्यास ती करपात्र असेल. पोटगी देणारा या पेमेंटसाठी कोणत्याही कर कपातीचा दावा करू शकत नाही.