Financial Year End : येत्या दोन दिवसांत आर्थिक वर्षाचा शेवट होणार आहे, त्यामुळे अनेक खासगी-सरकारी कार्यालये आपापली कामे संपवण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच, भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ने आपली देशभरातील कार्यालये 30 आणि 31 मार्च(शनिवार आणि रविवारी) रोजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, एलआयसीसह अनेक विमा कंपन्यांनी शनिवार आणि रविवारी त्यांची कार्यालये सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ग्राहकांना त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवस मिळतील.
IRDAI ने दिला होता सल्लाभारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने सर्व विमा कंपन्यांना 30 आणि 31 मार्च, म्हणजेच शनिवार आणि रविवारी त्यांची कार्यालये उघडी ठेवण्याचा सल्ला दिला होता. पॉलिसीधारकांच्या सोयीसाठी एलआयसीने शनिवार आणि रविवारी कार्यालये सुरू ठेवणार असल्याची माहिती दिली. एलआयसीच्या सर्व शाखा शनिवार आणि रविवारी सामान्य दिवसांप्रमाणे काम करतील. त्यामुळे आता तुम्हाला एलआयसीशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल, तर तुम्ही ते वीकेंडलाही पूर्ण करू शकता.
बँकांमध्येही कामे होतीलदरम्यान, आर्थिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने 31 मार्च रोजी सर्व एजन्सी बँकांना खुले ठेवण्याचे आदेश दिले होते. एजन्सी बँकांमध्ये 12 सरकारी बँकांसह एकूण 33 बँकांचा समावेश आहे. यामध्ये SBI, PNB, बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक यासह सर्व प्रमुख बँका आहेत.
आयकर विभागाचे कार्यालयही सुरू राहणार 2023-24 या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने बँका आणि LIC कार्यालयांप्रमाणे, प्राप्तिकर विभागाची कार्यालयेदेखील 30 आणि 31 मार्च रोजी सुरू राहतील. करदाते चालू आर्थिक वर्षाशी संबंधित कोणतेही काम शनिवार आणि रविवारी पूर्ण करू शकतात.