Jio Financial Services News: जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं भारतात विमा क्षेत्रात भागीदारीसाठी अलियान्झ एसईसोबत चर्चा केल्याची माहिती समोर आलीये. जर्मन कंपनी अलियान्झनं भारतात दोन संयुक्त उपक्रम सुरू केले आहेत आणि त्यांना ते बंद करू इच्छा असल्याची माहिती समोर आलीये. अशा परिस्थितीत जिओ फायनान्शिअल अलियान्झच्या पुढील भागीदारीसाठी हात पुढे करत आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेन सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिओ फायनान्शिअल आणि अलियान्झ देशात जनरल इन्शुरन्स आणि लाइफ इन्शुरन्स कंपनी स्थापन करण्याचा विचार करत आहेत. मात्र, ही चर्चा अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
अलियान्झ Bajaj Finserv ची साथ सोडणार?
जर्मन कंपनी अलियान्झ सध्या बजाज समूहाच्या बजाज फिनसर्व्हसोबत देशात व्यवसाय करत आहे. परंतु उपक्रमांपासून वेगळं होण्याचा सक्रियपणे विचार करत असल्याचे संकेत दिले आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, खुद्द बजाजनं मंगळवारी याचा खुलासा केला.
मात्र, भारतीय विमा बाजारातून आपण जाणार नाही, म्हणजेच अन्य कोणत्याही कंपनीशी हातमिळवणी करू शकतो, असे संकेतही अलियान्झने दिले आहेत. सूत्रांनी ब्लूमबर्गला दिलेल्या माहितीनुसार भागीदारीवरून झालेल्या वादामुळे अलियान्झ आणि बजाज फिनसर्व्ह वेगळे होत आहेत. जिओ फायनान्शिअल आणि अलियान्झ एकत्र येण्याबाबत विचारलं असता जिओ फायनान्शियलच्या प्रवक्त्यांनी अटकळांवर कंपनी काहीही बोलू शकत नाही आणि कंपनीशी निगडित सांगण्याजोगी काही माहिती असेल तेव्हा ती सांगितली जाईल अशी प्रतिक्रिया जिओ फायनान्शिअलच्या प्रवक्त्यांनी दिली. अशाच प्रकारची प्रतिक्रिया अलियान्झच्या प्रवक्त्यांकडूनही देण्यात आली.
कामथ यांच्या हाती धुरा
जिओ फायनान्शियलची धुरा ज्येष्ठ बँकर केव्ही कामत यांच्या हाती आहे. ती आधीपासूनच शॅडो बँक चालवते आणि इन्शूरन्स ब्रोकरेज आहे. त्यांनी मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय सुरू करण्यासाठी ब्लॅकरॉकशी हातमिळवणी केली आहे. आता विमा व्यवसाय सुरू केल्यास ही कंपनी पुढेही जाऊ शकते. इन्शुरन्स रेग्युलेटर आयआरडीएआयच्या आकडेवारीनुसार, भारतातील विमा क्षेत्राचं वर्चस्व म्हणजेच जीडीपीच्या तुलनेत प्रीमियम दक्षिण आफ्रिका आणि कॅनडासारख्या देशांच्या तुलनेत निम्म्याहूनही कमी आहे. अशा परिस्थितीत येथील विमा क्षेत्रात वाढीला जोरदार वाव आहे.