patanjali and magma general insurance : देशभरात वाढत्या उष्णतेमुळे लोक हैराण झाले असून शीतपेयांची मागणी वाढली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांना आकर्षित करण्यावरुन दोन शीतपेय कंपन्यांमध्ये वादाला तोंड फुटले आहे. बाबा रामदेव यांनी आपल्या पतंजली कंपनीच्या शीतपेयाची ब्रँडींग करताना प्रतिस्पर्धी कंपनीवर टीका केल्याने या वादाला सुरुवात झाली. सध्या शीतपेय कंपनी रूह अफजा आणि पतंजली यांच्यात वादविवाद सुरू आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, बाबा रामदेव यांनी आणखी एका व्यवसायत प्रवेश केला आहे. पतंजली आता आरोग्य विमा क्षेत्रात आपलं नशीब आजमावणार आहे. भारतीय स्पर्धा आयोगाने (CCI) पतंजली आयुर्वेद आणि इतर 5 युनिट्सना मॅग्मा जनरल इन्शुरन्समध्ये बहुसंख्य हिस्सा खरेदी करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.
पतंजली आता आरोग्य विमा क्षेत्रात
सीसीआयला दिलेल्या माहितीनुसार, मॅग्मा जनरल इन्शुरन्स लि. अधिग्रहण करणाऱ्या संस्थांचे शेअर्स खरेदी करून कंपनीतील ९८.०५५ टक्के हिस्सा अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव पतंजलीचा आहे. आयोगाच्या मंजुरीनंतर, बाबा रामदेव यांची पतंजली आयुर्वेद लिमिटेड मॅग्मा ही जनरल इन्शुरन्सची प्रवर्तक संस्था असेल. या व्यवहारानंतर पतंजली आणखी एका नवीन क्षेत्रात उतरणार आहे. पंतजली सध्या विविध व्यवसायत गुंतली आहे.
अदार पूनावाला यांची पतंजलीसोबत डिल
अदार पूनावाला यांच्या सनोती प्रॉपर्टीजने मॅग्मा जनरल इन्शुरन्समधील आपला हिस्सा पतंजली आयुर्वेद आणि इतर काही कंपन्यांना विकला आहे. अदार पूनावाला यांचा सनोती प्रॉपर्टीजमध्ये ९० टक्के हिस्सा आहे. पतंजली आयुर्वेद ही एक भारतीय बहुराष्ट्रीय समूह होल्डिंग कंपनी आहे. जी बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांनी स्थापन केली आहे. ही कंपनी आयुर्वेदिक औषधे, अन्न उत्पादने आणि सौंदर्यप्रसाधनांच्या वस्तूंचे उत्पादन करते.
वाचा - 'या' लोकांना मिळणार नाही आयुष्मान कार्ड; तुमचे नाव तर यादीत नाही ना? असे तपासा ऑनलाईन
तर, अदार पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आहेत. ही कंपनी देशातील आणि जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटनेच कोरोनाविरुद्ध कोविशिल्ड लस तयार केली होती. ही कंपनी आरोग्यसेवा आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रात सक्रिय आहे.