Health Insurance Premium Rising : एकीकडे वैद्यकीय खर्च वाढतोय म्हणून आरोग्य विमा खरेदी केला. तर दुसरीकडे विम्याचा प्रीमियम वाढत असल्याने तो कसा भरावा? या विवंचनेत सध्या लाखो लोक आहेत. यासंदर्भात नुकताच एक अहवाल समोर आला. यामध्ये आरोग्य विमा नूतनीकरण करणाऱ्यांची संख्या कमी होत आहेत. अनेकजण एकतर पूर्ण प्रीमियम भरत नाहीत. किंवा स्वतःला कमी कव्हर असलेल्या प्लॅनमध्ये हस्तांतरित करत आहेत. तर दुसरीकडे लोकांवर आता कर्ज काढून विम्याचे हप्ते भरण्याची वेळ आली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलंत. आरोग्य विमा पॉलिसींच्या प्रीमियमची किंमत इतकी वाढली आहे की लोक त्यांची पॉलिसी कायम ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज काढत आहे.
प्रीमियम भरण्यासाठी वित्तीय संस्था देतायेत कर्ज
विशेष म्हणजे आरोग्य विम्याचे प्रिमीयम भरण्यासाठी अनेक वित्तीय संस्था कर्जही देत आहेत. फिन्सल, बिम्पे, फिनश्योर आणि इंश्योर फिन सारखे अनेक स्टार्टअप कंपन्या आरोग्य विमा प्रीमियम भरण्यासाठी कर्ज देत आहेत. या कंपन्यांचे म्हणणे आहे की दर महिन्याला सुमारे ७००० नवीन ग्राहक कंपन्यांमध्ये सामील होत आहेत. प्रीमियम भरण्यासाठी कर्ज घेणारे ग्राहक किमान ४०,००० रुपयांचे कर्ज घेत आहेत आणि त्यावर १२ ते १६ टक्के व्याजही भरत आहेत.
कोणत्या शहरांमध्ये लोक सर्वाधिक कर्ज घेत आहेत?
बिम्पेचे सीईओ हनुमत मेहता म्हणतात की, सर्वात जास्त कर्जे लहान शहरांमधील लोक घेत आहेत. सुमारे ७० टक्के ग्राहक त्यांच्याकडे टियर २ आणि टियर ३ सारख्या छोट्या शहरांमधून कर्ज घेण्यासाठी येतात.
आरोग्य पॉलिसीधारक चिंतेत
आरोग्य पॉलिसीच्या वाढत्या प्रीमियममुळे पॉलिसीधारक चिंतेत आहेत. या कारणास्तव, काही विमाधारक आरोग्य योजना सोडत आहेत. या वर्षी, १० पैकी १ ग्राहकाने त्यांच्या आरोग्य विम्याचे नूतनीकरण केले नाही, तर काही लोक आहेत ज्यांनी पूर्ण प्रीमियम भरला नाही. आरोग्य विमा घेणाऱ्या एकूण पॉलिसीधारकांपैकी, सुमारे १०% लोकांच्या प्रीमियममध्ये ३०% किंवा त्याहून अधिक वाढ झाली आहे. त्यामुळे अर्ध्या लोकांनी पूर्ण प्रीमियम भरला नाही. एका वर्षाच्या आत, सुमारे ५२ टक्के पॉलिसीधारकांच्या आरोग्य विमा प्रीमियमची किंमत सुमारे २५ टक्क्यांनी वाढली आहे.
आरोग्य सेवा खर्चात वाढ
कोरोना महामारीपासून लोक त्यांच्या आरोग्य आणि आरोग्य विम्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत. आता तरूणही स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याची खूप काळजी घेत आहेत. ते प्रीमियमची रक्कम भरण्याचा सोपा पर्याय निवडत आहेत. एश्योर फाईनचे सीईओ चित्तरंजन सवदी सांगतात की, सरासरी लोक ५५,००० रुपयांचे कर्ज घेत आहेत. हा स्टार्टअप फक्त ४ महिन्यांपूर्वी सुरू झाला होता. त्याच्याकडे येणारे बहुतांश ग्राहक ४० ते ५० वयोगटातील आहेत.