health insurance : सध्याच्या काळात आरोग्य विमा असणे फार आवश्यक झाले आहे. तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीत कामाला असाल तर कंपनी तुमचा आरोग्य विमा काढते. त्यासाठी तुमच्या पगारातून पैसे कापले जातात. पण, कंपनी पुरवत असलेला विमा पुरेसा आहे का? त्यासाठी तुम्हाला जास्त पैसे माजावे लागत आहेत का? की पर्सनल विमा घेणे फायदेशीर ठरेल? असा गोंधळ अनेक नोकरदारांचा पाहायला मिळतो. तुमच्याही मनात असेच प्रश्न येत असतील तर ही बातमी तुम्हाला निर्णय घेण्यास नक्कीच मदत करेल.
कार्पोरेट कंपन्यांचा आरोग्य विमा परिपूर्ण असतो?कार्पोरेट कंपन्या पुरवत असलेला आरोग्य विम्यात संपूर्ण कव्हर असतो, असा अनेक नोकरदारांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात यात तथ्य नाही. कारण कंपन्या ऑफर करत असलेल्या कव्हरमध्ये अनेक मर्यादा असतात. यामध्ये कव्हर मर्यादा निश्चित असते. त्यामुळे, तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे की आपण केवळ कंपनीने दिलेल्या आरोग्य विम्यावर अवलंबून राहू नये. त्यापेक्षा वेगळे विमा संरक्षण घेतले पाहिजे. आज आपण कंपनीचा आरोग्य विमा आणि वैयक्तिक आरोग्य विमा यातील फरक समजून घेऊ. म्हणजे तुम्हाला निर्णय घेणे सोपे होईल.
कॉर्पोरेट आरोग्य विम्यातील मर्यादा कोणत्या?कॉर्पोरेट हेल्थ इन्शुरन्स हा कुठलीही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना पुरवत असते. परंतु, यात काही मर्यादा आहेत. जसे की कॉर्पोरेट आरोग्य विमा अनेकदा गंभीर आजार किंवा जुनाट समस्यांसाठी पुरेसे संरक्षण देत नाही. यामध्ये कुटुंबातील सदस्यांसाठी देखील मर्यादित कव्हर मिळतो. त्याच वेळी, बहुतेक कॉर्पोरेट योजना फ्लोटर आधारावर कार्य करतात. कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी मर्यादित सुरक्षा कव्हर असतो. आधीपासून अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय परिस्थितींसाठी कव्हरेज मर्यादित असू शकते. कॉर्पोरेट आरोग्य विमा योजनांमध्ये अनेकदा हाई डिडक्टिबल असतात. त्यामुळे हा आरोग्य विमा अनेकवेळा अपुरा ठरतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
वैयक्तिक आरोग्य विमातुम्ही तुमच्या सोयीनुसार वैयक्तिक आरोग्य विमा घेऊ शकता. तुम्ही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा आरोग्य विमा घेऊ शकता. फक्त यासाठी तुम्हाला वेगवेगळे प्रीमियम भरावे लागतील. तुम्हाला वैयक्तिक किंवा कौटुंबिक योजनांमध्ये अधिक लवचिकता मिळते. आरोग्य विमा देणाऱ्या अनेक कंपन्या तुम्हाला नो क्लेम बोनसचाही लाभ देते. म्हणजे वर्षभरात तुम्ही विमा दावा केला नाही तर ठराविक रक्कम तुमच्या पुढील विम्यात जोडली जाते.