समलैंगिक व्यक्तींना म्हणजेच एलजीबीटीक्यूंना सर्वोच्च न्यायालयाने गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढले आणि त्यांच्यासाठी अनेकांनी दरवाजे खुले केले आहेत. या लोकांना एकप्रकारची मान्यताच मिळाल्यासारखे झाले आहे. याचा फायदा विमा कंपन्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे.
फ्युचर जनरली इंडिया या इन्शुरन्स कंपनीने LGBTQIA+ आणि लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या कपलसाठी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणण्याची घोषणा केली आहे. सामान्य हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीत काही बदल केले जाणार आहेत. त्यातील नियम अटी बदलल्या जाणार आहेत. कंपनीने LGBTQIA+ समुह, लिव्ह इन पार्टनर आणि लिव्ह इन रिलेशनशिपचा अंतर्भाव करण्यासाठी कुटुंबाची व्याख्या देखील बदलली आहे.
या व्यक्तींनाही सामान्य कुटुंबातील सदस्यांप्रमाणे आरोग्य विमा सुविधेचा लाभ घेता येणार आहे. विमा कंपनीच्या या निर्णयामुळे LGBTQIA+ समुदायाच्या सदस्यांना आणि लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना चांगले आरोग्य विमा संरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यामध्ये लिंग बदल शस्त्रक्रिया आदी खर्चाचा समावेश असणार नाही.
या ग्राहकांना FG Health Absolute चा लाभही मिळणार आहे. टेली-समुपदेशन, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरील वेबिनार, वेलनेस सेंटर्स, फिटनेस सेंटर्स, स्पोर्ट्स आणि डायग्नोस्टिक सेंटर्ससाठी व्हाउचर याद्वारे दिली जाणार आहेत. जननेंद्रियाची पुनर्रचना किंवा लिंग बदलासारख्या शस्त्रक्रिया या योजनेत समाविष्ट केल्या जाणार नाहीत. सध्या या पॉलिसीमध्ये लिंग बदलाशी संबंधित उपचारांचा समावेश केला जाणार नाही, असे कंपनीच्या अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.