Cheapest Insurance of India : महागाईच्या काळात चॉकलेटही १ रुपयाच्या कमी मिळत नाही. अशा परिस्थितीत फक्त ४५ पैशांत १० लाख रुपयाचं विमा संरक्षण मिळतंय असं सांगितलं तर विश्वास बसेल का? पण, हे सत्य आहे. जीवन विम्यासाठी साधारणपणे हजारो रुपयांचा प्रीमियम दरवर्षी भरावा लागतो. पण, आयआरसीटीसी फक्त ४५ पैशांमध्ये रेल्वे प्रवाशांना १० लाख रुपयांचे विमा संरक्षण देते. आज येथे आपण IRCTC च्या या विमा योजनेबद्दल सखोल जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
फक्त या परिस्थितीत मिळते १० लाखांचे विमा संरक्षण
आयआरसीटीसीद्वारे तिकीट बूक करणाऱ्या प्रवाशांनाच हे १० लाख रुपयांचे विमा संरक्षण उपलब्ध आहेत. या योजनेअंतर्गत, विमा संरक्षण फक्त कन्फर्म, आरएसी, अंशतः कन्फर्म झालेल्या तिकिटांवर मिळते. याचा लाभ ५ वर्षांखालील मुलांसाठी उपलब्ध नाही. मात्र, ही सुविधा ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी घेता येते. दुखापत झाल्यास उपचार खर्चाचे कव्हरेज मृत्यू/कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व/आंशिक अपंगत्वापासून वेगळे आहे.
रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये मिळतात.
आयआरसीटीसीच्या या विमा योजनेंतर्गत रेल्वे अपघातात मृत्यू झाल्यास १० लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास १० लाख रुपये, कायमचे आंशिक अपंगत्व आल्यास ७.५ लाख रुपये, दुखापत झाल्यास, रूग्णालयात भरतीसाठी २ लाख रुपये आणि मृतदेह वाहतुकीसाठी १०,००० रुपयांचे संरक्षण उपलब्ध आहे. IRCTC नुसार, दावा/दायित्व पॉलिसीधारक आणि पॉलिसी कंपनी यांच्यात असेल.
...तरच विमा मिळेल
ही विमा सुविधा पूर्णपणे ऐच्छिक आहे. पण, अवघ्या ४५ पैशांमध्ये १० लाख रुपयांचा विमा मिळत असेल तर तो काढणे शहाणपणाचे राहील. देशात दररोज करोडो प्रवासी ट्रेनमधून प्रवास करतात. अनेक प्रवासी शेकडो आणि हजारो किलोमीटर लांब पल्ल्याचा प्रवास गाड्यांमधून करतात. कुठलाही अपघात सांगून होत नाही. अशा परिस्थितीत, IRCTC द्वारे प्रदान केलेल्या या सुविधेचा लाभ घेण्यास कोणत्याही प्रकारचे नुकसान नाही, फक्त फायदे आहेत.