प्रितीष किशोर गोविंदपुरकर
अचानक सकाळी ६ वाजता अचानक फोन वाजला आणि मी झोपेतून जागा झालो. डोळे हळूहळू उघडतच फोन उचला. माझ्या एका मित्राचा फोन होता. इतक्या सकाळी फोन आलेला त्यामुळे आधीच मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली. त्यात त्याच्या आवाजाच्या पट्टीने मनात अजून प्रश्न यायला लागले.
मित्र- तुझी आता मला खूप गरज आहे. जरा नीट ऐकून घे.
अर्धवट झोपेतून मी पूर्णपने जागी झालो कारण असा कधीच ना बोलणार आज अचानक का असा बोलोतोय हे कळेनासं झालं होतं.
मी - तू बोल मी ऐकतोय...
मित्र - बाबांना रात्री अचानक त्रास झाला आणि आम्ही त्याना दवाखान्यात दाखल केलं. तेव्हा असा कळलं की त्याना हृदयविकाराचा झटका आला. लगेच एन्जिओग्राफी केली आणि त्या मध्ये खूप कठीण बाबी समोर आल्यात. २४ तासांमध्ये मोठा ऑपेरेशन करणं गरजेचं आहे. स्टेंट टाकावा लागेल आणि जवळपास १२ लाख रुपये खर्च सांगितला आहे. माझ्या कंपनीच्या विम्यामध्ये ५ लाख आहेत. वरील तरतूद मी करतोय. पण तू आलास तर काही तरी मदत होईल.
मी हो बोलून फोन ठेवला. २ वर्ष पूर्वी मी आणि कौशिक त्याच्या घरी काही घरघुती कार्यक्रमासाठी गेलो होतो, तेव्हा आमचा झालेला सवांद आठवला. मी आरोग्य विमा क्षेत्रामध्ये कार्यरत असल्यामुळे साहजिकच माझा कोणताही सवांद त्या शिवाय पूर्णच होत नाही. मी मित्राला विचारणा केली, तुझी आणि कुटुंबाची आरोग्य विम्याची योग्य ती तरतूद केली आहेस का रे?
त्यावर त्याचे मला अपेक्षित उत्तर मिळालं - हे बघ मी काम करत असलेल्या कंपनीनं माझी आणि माझ्या आई वडिलांची ५ लाखची विमा पॉलिसी दिली आहे. त्यामुळे मला नाही वाटत की अजून वेगळा विमा घायची गरज आहे.
मी - अरे पण आजकाल ५ लाखांमध्ये काय होतं. २ वर्षांपूर्वी आलेल्या करोनानं आपल्याला हे शिकवलंय. मूळात ५ लाख फॅमिली फ्लोटर म्हणजे एकत्र विमा कव्हर हेच खूप कमी आहे. आई वडिलांच्या वाढत्या वयाचा विचार कर, कारण ज्येष्ठ नागरिकांना आजार होण्याची अधिक शक्यता असते. सध्याच्या जीवन पद्धतीचा पण नीट विचार कर आणि त्या प्रमाणे योग्य कव्हर असेलला कोणत्याही कंपनीचा विमा घे.
आरोग्य विमा घेताना लक्षात ठेवण्याचे ५ महत्त्वाचे मुद्दे असतात.
१. आरोग्य विमा पॉलिसी घेताना त्या पॉलिसीचा वेटिंग पिरियड.
२. कंपनी क्लेम सेटलमेंट रेशो.
३.पॉलिसीमध्ये कोणकोणत्या खर्चाचा समावेश आहे.
४.आधीपासून असलेल्या आजारांना पॉलिसीत कव्हर करतात की नाही.
५. विमा कंपनीच्या नेटवर्कमध्ये समाविष्ट असलेली हॉस्पिटल्स.
दिवसेंदिवस वैद्यकीय खर्च महाग होत चालला आहे. पण जर आपण अगोदरच आरोग्य विमा काढला असेल, तर आपल्याला आपत्कालीन परिस्थितीत योग्य ती भरपाई विमा कंपनी कडून मिळते. ज्यामुळे आपल्या कुटुंबाला योग्य ती मदत होते. तू सध्या तुझ्या घरातला एकमेव कमवता व्यक्ती आहेस. तुझ्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणं हेदेखील तुझ्या कर्तव्यांपैकीच एक आहे.
माझं सगळं बोलणं एकाद्या फुकटच्या उपदेशासारखा ऐकून माझ्या मित्रानं मला खूप शांतपणे उत्तर दिलं.
मित्र - अरे आता कृपा करुन तुझ्या कंपनीचं मार्केटिंग करु नकोस आणि मूळात आरोग्य विमाची गरज जास्त पडते कुठे? बघू गरज पडलीच तर पुढे घेऊ .
मी - जेव्हा आपल्यालाला गरज असते तेव्हा आरोग्य विमा मिळत नसतो.
हे सगळं संभाषण अचानक एक मिनिटामध्ये माझ्या डोळ्यासमोरून गेलं. खरंच मी तेव्हा आग्रह केला असता आणि आरोग्य विमा कवच घ्यायला लावलं असतं तर आजची परिस्थिती कदाचित वेगळी असली असती.
आपण सर्वांनी आरोग्य विमा घेण्याचं महत्व समजून घेतलं पाहिजे आणि योग्य त्या प्रकारचा, तसंच मुबलक विमा नक्की घेतला पाहिजे. जर आरोग्य विमा आपल्याजवळ असेल तर आपल्याला आपत्कालीन वैद्यकीय परिस्थितीत कोणतीही काळजी करण्याची वेळ येणार नाही. आपल्या कुटुंबाला कोणत्या पण आर्थिक जोखीमेमध्ये टाकू नका. ते म्हणतात ना Prevention is better than cure .
आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) म्हणजे एक असा विमा जो आपल्याला आपल्या आपत्कालिन परिस्थितीत, आजार किंवा गंभीर आजारामुळे वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत खर्चापासून आपल्या कुटुंबाचे आर्थिक संरक्षण करतो. यालाच आपण मेडिक्लेम असंही म्हणतो.
आरोग्य हेच जीवन आहे. त्यामुळे आरोग्य विमा असणे कधीही चांगले. विमा असेल तर कोणत्याही रुग्णालयात तुम्हाला उपचार घेता येऊ शकतात. कारण संकटकाळी तुम्हाला हाच आरोग्य विमा उपयोगी पडू शकतो. आरोग्य विमा हा सध्याच्या काळात अतिशय महत्त्वाचा आहे.
(लेखक हे विमा क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)