Join us  

स्वस्त आरोग्य विमा मिळणार, LIC ने आखली योजना; नवीन सरकार स्थापन होताच मिळणार मंजूरी...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 9:08 PM

LIC Health Insurance: सरकारी विमा कंपनी LIC आता आरोग्य विमा विभागात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

LIC Health Insurance: तुम्ही स्वतःसाठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी LIC पॉलिसी घेतली असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. सरकारी विमा कंपनी LIC आता आरोग्य विमा (Medical Insurance) विभागात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यासाठी एलआयसी याच क्षेत्रात आधीपासून कार्यरत असलेली एखादी कंपनी विकत घेण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नवीन सरकार आल्यानंतर यासाठी मंजूरी मिळण्याची अपेक्षा आहे. एलआयसीच्या वतीने सांगण्यात आले की, कंपनी आपल्या स्तरावर याबाबत तयारी करत आहे. 

विमा कायद्यात बदल आवश्यक फेब्रुवारी 2024 मध्ये संसदेच्या एका समितीने विमा कंपन्यांचा खर्च आणि अनुपालन ओझे कमी करण्यासाठी संयुक्त विमा परवाना देण्याची सूचना केली होती. सध्याच्या परिस्थितीत, जीवन विमा कंपन्या केवळ आरोग्य विम्याअंतर्गत दीर्घकालीन लाभ देऊ शकतात. LIC ला हॉस्पिटलायझेशन आणि इतर खर्चाचा विमा काढण्यासाठी विमा कायद्यात बदल आवश्यक आहेत.

दरम्यान, देशातील विमा बाजार अद्याप फारसा विकसित झालेला नाही. 2022-23 मध्ये केवळ 2.3 कोटी आरोग्य विमा पॉलिसी जारी करण्यात आल्या, ज्याद्वारे सुमारे 55 कोटी लोकांना संरक्षण मिळाले. यापैकी 30 कोटी लोक सरकारी योजनेंतर्गत आणि 20 कोटी लोकांना कंपन्यांकडून मिळालेल्या विम्यांतर्गत संरक्षण दिले जाते. अधिकाधिक लोकांनी आरोग्य विमा घ्यावा अशी सरकारची इच्छा आहे. आता या विभागात एलआयसीच्या प्रवेशामुळे आरोग्य विमा घेणाऱ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.

टॅग्स :एलआयसीवैद्यकीयव्यवसायआरोग्य