जर तुमच्याकडे कार असेल तर कारचा विमा काढणं अनिवार्यच आहे. सामान्यतः आपल्या वाहनाचा अपघात झाला किंवा काही नुकसान झालं तर विम्याच्या माध्यमातून आपण क्लेम करून वाहन दुरुस्त करुन घेऊ शकतो. परंतु क्लेम म्हणून, वाहनाच्या वयानुसार तुम्हाला विमा कंपनीकडून रक्कम दिली जाते. म्हणजे जसजसं तुमचं वाहन जुनं होत जातं तसतसं त्याची बाजारातील किंमतही कमी होते. कालांतरानं वाहनाचे पार्ट्सही जीर्ण होतात किंवा जुने होतात. अशातच विम्याची रक्कमही वाहनाच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणेच मिळते. परंतु जर तुम्ही त्यात झिरो डेप कव्हर (Zero Dep Cover) अॅड-ऑन केलं तर तुम्हाला कोणत्याही खर्चाशिवाय किंवा वजावटीशिवाय वाहनाचा क्लेम मिळतो. पाहूया झिरो डेपचे काय आहेत फायदे.
काय आहे Zero Dep Coverझिरो डेप कव्हरला झिरो डेप्रिसिएशन (Zero Depreciation) किंवा झिरो डेप इन्शुरन्स असेही म्हणतात. हे एक सहायक कव्हर असं म्हणता येईल. ज्याद्वारे वाहन जुनं झालं असलं तरीही विम्याची रक्कम कमी होऊ देत नाही. डेप्रिरिसिएशन म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत कमी होणं. अशातच झिरो डेपमध्ये ती कमी होत नाही. वास्तविक, जेव्हा तुम्ही दरवर्षी कारच्या विम्याचं नूतनीकरण करता तेव्हा कारच्या मूल्यासह, त्याची इन्शूरन्सची रक्कमही कमी होते. परंतु तुम्ही तुमच्या वाहन विम्यासोबत झिरो डेप कव्हर जोडल्यास विम्याची रक्कम कमी होत नाही.
अशा परिस्थितीत, अपघातात तुमच्या वाहनाचे नुकसान झाल्यास, विमा कंपनी क्लेमची संपूर्ण रक्कम देते. यामध्ये वाहनाच्या पार्टसच्या नुकसानीचा खर्चही समाविष्ट आहे. कार इन्शूरन्स घेताना, जर तुम्ही त्यात झिरो डेप कव्हर घेतलं तर त्याचा प्रीमिअम काही टक्क्यांनी वाढतो. जर तुम्ही नवीन वाहन घेतलं असेल तर तुम्हाला सुरुवातीपासूनच झिरो डेपचा पर्याय मिळतो.
कोणासाठी महत्त्वाचा
- जर तुम्ही नवीन वाहन खरेदी केलं असेल तर तुम्ही झिरो डेप पॉलिसी घेतली पाहिजे. कारण कार किंवा वाहन डेप्रिसिएशन, ते खरेदी करण्यापासूनच सुरू होतो.
- जर तुमच्याकडे महागडी लक्झरी कार असेल तर तुमच्यासाठी हे अतिशय महत्त्वाचे आहे. महागड्या कार्सचे पार्ट्सही तितकेच महाग असतात.
- जर तुम्ही नव्यानं कार शिकला असाल, तरीही झिरो डेप पॉलिसी कव्हर घेणं आवश्यक आहे. तुमच्यासाठी ते फायद्याचं ठरू शकतं.