Reliance Jio Financial: रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे आपल्या कंपन्यांचा तेजीनं विस्तार करताना दिसत आहेत. सध्या अनेक क्षेत्रांमध्ये त्यांच्या कंपन्यांचं कामकाज सुरु आहे. अशातच भारतीय जीवन आणि सामान्य विमा बाजारात पुन्हा एन्ट्री करण्यासाठी अलियान्झ एसई मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस (JFSL) सोबत करार करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी अलियान्झने बजाज समूहासोबतचा २४ वर्षांचा संयुक्त उपक्रम संपुष्टात आणण्याची घोषणा केली होती. बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी आणि बजाज अलियान्झ लाइफ इन्शुरन्स कंपनीतील आपला २६ टक्के हिस्सा २.८ अब्ज डॉलरमध्ये आपल्या भारतीय भागीदाराला विकणार आहे. ही रक्कम अनेक हप्त्यांमध्ये भरण्यात येईल.
ईटी न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार, अलियान्झ आणि जिओ फायनान्शियलची मालकी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या अधिकाऱ्यांमध्ये अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये जेव्हा अलियान्झ आपला हिस्सा विकण्याचा सक्रियपणे विचार करत असल्याचं जाहीर झालं तेव्हा ही चर्चा तीव्र झाली. अलीकडच्या आठवड्यत या चर्चेला वेग आला आहे.
५० टक्के भागीदारी हवी
त्यांना कोणत्याही नवीन उपक्रमात कमीतकमी ५०% भागीदार व्हायचं आहे आणि कदाचित ते उच्च भागीदारीसाठी देखील तयार असतील, याबाबत अलियान्झ स्पष्ट आहे. त्याचबरोबर मॅनेजमेंट आणि ऑपरेशन्समध्येही त्यांना अधिक महत्त्वाची भूमिका हवी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बजाज समूह आपला हिस्सा कमी करण्यास फारसा उत्सुक नव्हता, ज्यामुळे त्यांच्या भागीदारीच्या दिशेबाबत मतभेद निर्माण झाले होते. भारतात विमा क्षेत्रात १०० टक्के थेट परकीय गुंतवणुकीला (FDI) परवानगी आहे.
औपचारिक घोषणा कधी होणार?
भारतीय स्पर्धा आयोग आणि भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) सारख्या नियामकांकडून मंजुरी मिळाल्यानंतर अलियान्झ-जिओ उपक्रमाची औपचारिक घोषणा केली जाईल. अलियान्झला आधी स्वत:ला प्रवर्तकपदावरून हटवावं लागणार आहे.
सर्वसाधारण सभेत योजनांचा उल्लेख
आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी २०२३ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जेएफएसएलच्या योजनांचा उल्लेख केला होता. जेएफएसएल विमा क्षेत्रात प्रवेश करेल आणि शक्यतो जागतिक कंपन्यांच्या भागीदारीत सोपी, परंतु स्मार्ट, जीवन, सामान्य आणि आरोग्य विमा उत्पादनं ऑफर करेल, असं ते म्हणाले होते. जेएफएसएलचा सध्या इन्शुरन्स ब्रोकिंगचा व्यवसाय आहे. त्यांनी आपला डायरेक्ट टू कन्झ्युमर पोर्टफोलिओ २४ वरून ५४ प्लॅनपर्यंत वाढवला आहे. हे प्लॅन ऑटो, हेल्थ आणि लाइफ अशा कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहेत. जेएफएसएल आपल्या संस्थात्मक प्लॅटफॉर्मला मजबूत करत आहे, ज्यात ग्रुप टर्म लाइफ, मेडिकल, पर्सनल अॅक्सिडेंट आणि कमर्शियल इन्शुरन्सचा समावेश आहे.