Join us

जीवन विम्याच्या नावे 'चोरांचा' डल्ला; दरवर्षी ३० हजार कोटींची लुबाडणूक

By जयदीप दाभोळकर | Updated: March 11, 2025 13:24 IST

फसवणुकीची ८६ टक्के प्रकरणे जीवन विम्याशी संबंधित; गैर-जीवन विम्यापेक्षा ६ पटींनी अधिक

समाजात जागरुकता वाढल्याने भारतात विमा उद्योग स्थिर गतीनं वाढत आहे. परंतु, या क्षेत्राला फसवणुकीच्या प्रकरणांनी चांगलंच ग्रासलेलं दिसतं. विमा क्षेत्रात उघडकीस येणारी फसवणुकीची तब्बल ८६ टक्के प्रकरणे जीवन विम्याशी निगडित आहेत. इतर विमा प्रकारांशी निगडित फसवणुकीच्या तुलनेत जीवन विम्यात होणारी फसवणूक सहापटीनं अधिक आहे. या फसवणुकीच्या प्रकारांमुळे दरवर्षी विमा उद्योगाला तब्बल ३०,४०१ कोटी रुपयांचे नुकसान सहन करावं लागत आहे. यामुळे विमा कंपन्यांना आपल्या ८.५ टक्के उत्पन्नावर पाणी सोडावं लागतंय.

दिवसेंदिवस ही समस्या गंभीर होऊ लागली आहे. जर हे असंच सुरू राहिलं तर याचा परिणाम केवळ विमा कंपन्यांपुरता मर्यादित राहणार नाही. याचा नकारात्मक परिणाम ग्राहकांच्या विश्वासार्हतेवरही पडू शकतो. त्यामुळे या समस्येला आळा घालणे गरजेचं आहे. ही समस्या विमा कंपन्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर कमजोर करीत आहे. यामुळे प्रामाणिक ग्राहकांना वाढलेल्या प्रीमियम दरांचा भुर्दंड सोसावा लागतो. हे गैर-जीवन विमा क्षेत्रात होणाऱ्या फसवणुकीपेक्षा जवळजवळ सहापट अधिक आहे.

कशी होते फसवणूक ? 

यात चोरटे पॉलिसी अटींच्या अनुकूल परंतु चुकीची वा अर्धवट माहिती देतात. असं केल्यानं अधिक कव्हरेज मिळवणं हा त्यांचा मुख्य हेतू असतो. चुकीची माहिती देताना आधीचे गंभीर आजार लपवले जातात. उत्पन्न किंवा रोजगाराचा तपशीलही चुकीचा भरला जातो. वय चुकीचं दिलं जातं. तंबाखू, मद्य, ड्रग्जचं सेवन आदी गंभीर सवयी यात लपवल्या जातात. विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी मृत्यूचा बनाव केला जातो. बनावट मृत्यू प्रमाणपत्र सादर केलं जातं. अनेकदा ग्राहकांना बनावट विमा पॉलिसी विकली जाते. त्यांच्याकडून कव्हरेज नसतानाही जादा प्रीमियम घेतला जातो. दावा करतेवेळी समजते की पॉलिसी वैध नाही.

घोटाळेबाजांपासून सावध कसं राहावं? 

दाव्यासाठी अनोळखी व्यक्तीचे आलेले मेल, फोन कॉल किंवा मेसेजपासून सावध राहावं. तिची पडताळणी झाल्याशिवाय तुमची माहिती देऊ नये. विमा एजंटनं पॉलिसीबाबत दिलेली माहिती तपासून घ्या. एखाद्या तपशिलाबाबत खात्री वाटत नसल्यास थेट कंपनीशी संपर्क साधावा. कोणतीही संशयास्पद कृती वा फसवणूक करणारा संदेश प्राप्त झाल्यास तत्काळ आपल्या विमा कंपनीला आणि संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार करावी.

टॅग्स :धोकेबाजीव्यवसाय