health insurance claims : महागाईच्या काळात रुग्णालयाचा खर्च सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. अशा परिस्थितीत चांगला आरोग्य विमा ही काळाची गरज बनली आहे. पण, कल्पना करा की तुमच्या कुटुंबातील कोणीतरी रुग्णालयात भरती आहे. आणि तुमची मेडिक्लेम पॉलिसी नाकारली गेली तर? विचारही करवत नाही ना? कारण, मोठी रक्कम भरुनही त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपचाराचा खर्च तुम्हाला स्वतःच्या खिशातून करावा लागेल. हे कोणासाठीही सहन करण्याच्या पलीकडे आहे. अशी परिस्थिती तुमच्यावर येऊ नये यासाठी तुम्ही आधीपासून काळजी घ्यायला हवी.
IRDAI डेटानुसार, मार्च २०२४ ला संपलेल्या आर्थिक वर्षात, विमा कंपन्यांनी २६००० कोटी रुपयांचे आरोग्य पॉलिसीचे दावे नाकारले. दरवर्षी हा आकडा वाढत आहे. २०२२-२३ या वर्षात हा आकडा १९.१० टक्के होता. चला जाणून घेऊया आरोग्य विमा कंपन्या क्लेम का नाकारतात?
वैद्यकीय दावे का नाकारले जातातप्रतीक्षा कालावधी दरम्यान दावा करणे : काही आरोग्य विमा ठराविक आजारांसाठी प्रतीक्षा कालावधी देतात. या काळात केलेला दावा नाकारला जातो. उदा. तुम्हाला डेंग्यूसाठी १ महिन्याची वेटिंग टाइम दिला आहे. पण, तुम्ही आधीच क्लेम केला तर तो दावा फेटाळला जातो.
विमा घेताना आजार लपवणे : दावा नाकारण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे पॉलिसी खरेदी करताना तुम्ही आधीच अस्तित्वात असलेले आजार लपवणे. पॉलिसी खरेदी करताना तुम्ही तुमचा आजार उघड केला नाही, तर अशा परिस्थिती विमाकर्ता दावा नाकारू शकतो.
लॅप्स्ड इन्शुरन्स पॉलिसी : जर तुमची विमा पॉलिसी संपली असेल किंवा तुम्ही एखादा प्रीमियम चुकवला असल्यास तुमचा विमाकर्ता तुम्हाला वैद्यकीय कव्हरेज नाकारू शकतो.
दावा करण्यात विलंब : प्रत्येक विमा पॉलिसीला दावा करण्यासाठी विशिष्ट वेळ मर्यादा असते. जर तुम्ही निर्धारित वेळेत दावा करू शकला नाही, तर तुमचा दावा नाकारला जाऊ शकतो.
सम ॲश्युअर्डपेक्षा जास्त क्लेम करणे : तुम्ही तुमच्या पॉलिसीच्या सम ॲश्युअर्डच्या बरोबरीचे दावे आधीच वर्षभरात केले असतील. तर त्याच वर्षात आणखी दावे करता येत नाही. किंवा दाव्याची रक्कम विम्याच्या रकमेपेक्षा जास्त असेल, तर अशी परिस्थिती कंपनी दावा नाकारते.