Join us

गरजूंसाठी संकटमोचक आहे 'ही' सरकारी स्कीम, ₹२० वार्षिक खर्चात मिळतं ₹२ लाखांचं कव्हर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 12:31 PM

संकटाची परिस्थिती कधी निर्माण होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. परंतु कठीण काळात ही सरकारी स्कीम सर्वांसाठी उपयुक्त ठरू शकते.

Pradhan Mantri Suraksha Bima Yojana: संकटाची परिस्थिती कधी निर्माण होईल याबद्दल काहीही सांगता येत नाही. अशा परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आर्थिकदृष्ट्या मजबूत असणं अत्यंत आवश्यक आहे. कठीण काळात, पैशांची सर्वाधिक गरज भासते. यामुळेच आजकाल विविध योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासोबतच लोक जीवन विमा, अपघात विमा आणि आरोग्य विमा यांसारख्या विमा पॉलिसी देखील खरेदी करत आहेत.  

परंतु गरीब आणि गरजू लोक आर्थिक अडचणींमुळे स्वतःसाठी असा विमा खरेदी करू शकत नाहीत. अशा लोकांसाठी सरकार अनेक प्रकारच्या योजना राबवते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत. या योजनेचं नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) आहे. ही योजना खास गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे. आज आपण त्याबद्दल जाणून घेऊ.

 

केवळ २० रुपये वार्षिक प्रीमिअम 

या योजनेअंतर्गत, अपघात झाल्यास २ लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण दिलं जातं. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणतीही व्यक्ती यामध्ये गुंतवणूक करू शकते. विशेष बाब म्हणजे २ लाख रुपयांचे संरक्षण देणाऱ्या या योजनेचा वार्षिक प्रीमियम फक्त २० रुपये आहे. त्यामुळे ही सहजरित्या परवडणारी स्कीम आहे. 

कोणत्या परिस्थितींमध्ये फायदा 

या योजनेंतर्गत, विमाधारक व्यक्ती अपघातात पूर्णपणे अपंग झाल्यास, जसं की दोन्ही डोळे, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास, त्याच्या कुटुंबाला २ लाख रुपयांची नुकसानभरपाई मिळेल. विमाधारकाच्या मृत्यूनंतरही कुटुंबाला २ लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अपघातात एक हात किंवा एक पाय गमावला किंवा एका डोळ्यातील दृष्टी गमावल्यास आणि ती परत मिळवता येत नसल्यास, १ लाख रुपयांपर्यंतची भरपाई दिली जाते. 

काय आहेत अटी? 

  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेसाठी दिलेला २० रुपयांचा वार्षिक प्रीमियम फक्त १ वर्षासाठी वैध आहे. यानंतर योजनेचं नूतनीकरण करावं लागेल.
  • अपघातात मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याची रक्कम नियमानुसार दिली जाईल.
  • अर्जदाराचं वय १८ ते ७० वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे आणि अर्जदार भारतीय असणं आवश्यक आहे.
  • उमेदवाराचं सक्रिय बचत खातं असणं आवश्यक आहे. खातं बंद झाल्यास पॉलिसी देखील लॅप्स होईल.
  • पॉलिसी प्रीमियमच्या ऑटो डेबिटसाठी अर्जदाराला संमती फॉर्मवर स्वाक्षरी करावी लागेल. 

कसा करू शकता अर्ज? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही https://www.jansuraksha.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकता. तुम्हाला ऑफलाइन अर्ज करायचा असल्यास तुम्हाला तुमच्या बँकेशी संपर्क साधावा लागेल.

टॅग्स :व्यवसायपंतप्रधानसरकार