Why Insurance Claim Rejects: कोरोना संसर्गापासून प्रत्येकाला आरोग्य विम्याचे महत्त्व लक्षात आलं आहे. महागाईच्या काळात वैद्यकीय खर्च परवडणे शक्य नाही. मात्र, अनेकदा आरोग्य विमा असूनही खिशाला कात्री लागते. कारण, आपल्या काही चुकांमुळे आपला दावा नाकारला जातो. आरोग्य विम्यामध्ये अनेक महत्त्वाची कलमे आहेत, यामध्ये प्रतीक्षा कालावधी, कव्हर नसलेले आजार, काळ्या यादीत टाकलेल्या रुग्णालयांची यादी अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. यामध्ये कोणत्याही नियमाबाबत जर तुमच्याकडून हलगर्जी झाली तर लाखो रुपयांचा विमा तुमच्या कामाला येणार नाही.
- वास्तविक, विमा कंपन्या काही आजार आणि आधीपासून अस्तित्वात असलेल्या व्याधींसाठी एक विशिष्ट वेळ ठरवतात. ज्याला प्रतीक्षा कालावधी म्हणतात. अशा परिस्थितीत, प्रतीक्षा कालावधीत संबंधित रोगाच्या उपचारांसाठी दावा केला गेला तर तो फेटाळला जातो.
- आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कव्हर नसलेल्या आजारांची स्थिती समजून घेणे महत्त्वाचे आहे. या अंतर्गत काही रोगांवर उपचार नेहमीच कव्हरेजच्या बाहेर असतात. यामध्ये अंमली पदार्थांच्या व्यसनासारख्या सवयींचा समावेश आहे, त्यामुळे पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी याबद्दल जाणून घेणे आवश्यक आहे.
- भविष्यात आपला आरोग्य विम्याचा दावा नाकारला जाऊ नये यासाठी आधीपासून काळजी घेणे आवश्यक आहे. आरोग्य विमा घेताना, कंपनीला तुमच्या आरोग्याविषयी योग्य माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण, तुम्ही लपवलेला आजार नंतर उघड झाल्यास कंपनी दावा नाकारू शकते.
- आरोग्य विमा घेतल्यानंतर, कंपनीच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे अधिक चांगले असते. वास्तविक, विमा कंपन्यांनी काही रुग्णालयांना काळ्या यादीत टाकले आहे. अशा स्थितीत या रुग्णालयांमध्ये उपचार घेतल्यास दावा फेटाळला जाण्याची शक्यता आहे.
- याशिवाय पॉलिसीधारक विनाकारण हॉस्पिटलमध्ये दाखल झाला तर क्लेम फेटाळला जाऊ शकतो. संसर्गजन्य आजार जसे ताप, थंडी, सर्दी, खोकला हे आजार औषधांनी बरे होतात. यासाठी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याची गरज नाही. असे आढळल्यास कोणताही दावा मिळत नाही.