- दिलीप फडके
(ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते
तुमचे प्रश्न / अडचणी पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता : tarkaikaral@gmail.com)
भारतीय जीवन विमा पॉलिसी घेतली. सात वर्षे पैसे भरले आहेत. पॉलिसी चालू होती. विमाधारक गळफास घेऊन मरण पावले. विमा कंपनीने विम्याची रक्कम दिली नाही. आम्हाला काय करता येईल?
- एक वाचक
नॉमिनीला विम्याची रक्कम मिळेल का ? याचे उत्तर ज्या अटींवर पॉलिसी दिलेली आहे, त्यावर अवलंबून असते. आपल्या पॉलिसीमध्ये आत्महत्या कव्हरेज वगळण्याबद्दल व विमा रक्कम देण्याबद्दल काही वेगळ्या तरतुदी आहेत का, ते पाहणे महत्त्वाचे ठरेल. साधारणपणे पॉलिसी काढल्यापासून सुरुवातीच्या एका वर्षांत आत्महत्येने झालेला मृत्यू कव्हर होत नाही. आत्महत्येच्या प्रकरणांमध्ये विम्याची रक्कम बारा महिन्यांची मुदत संपण्यापूर्वी देण्यावर निर्बंध असल्याने विमा कंपन्यांना विमा फसवणूक रोखण्यात मदत होते.
अशीही शक्यता असू शकते की एखाद्या पॉलिसीधारकाने खूप मोठे कर्ज घेतले आहे. प्रथम जीवन विमा खरेदी करून आणि नंतर आत्महत्या करून त्याला या परिस्थितीतून बाहेर पडायचे आहे. त्यामुळे पॉलिसी जारी झाल्यानंतर बारा महिन्यांच्या आत पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास विम्याची रक्कम मिळू शकत नाही; पण त्या मुदतीनंतर आत्मघाती मृत्यू असला तरी विम्याची रक्कम द्यायला नकार दिला जाऊ शकत नाही. एखाद्या पॉलिसीधारकाने आत्महत्या केली असेल तर त्याचे कुटुंब भावनिक, आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त होते. त्यामुळे पॉलिसीधारकाच्या वारसांना विम्याची रक्कम मिळणे आवश्यक असते.
पॉलिसी कालबाह्य असल्यास रक्कम मिळण्यात अडचणी येतात. अशा पॉलिसीचे पुनरुज्जीवन केल्यास पुनरुज्जीवनाच्या तारखेपासून बारा महिन्यांच्या आत पॉलिसीधारकाने आत्महत्या केल्यास दावा नाकारला जाऊ शकतो. पॉलिसीधारकाने चुकीची माहिती दिल्यासही दावा रद्द होऊ शकतो. आत्महत्येच्या प्रसंगात विम्याची रक्कम द्यायला अयोग्य कारणे दाखवून विमा कंपनी नकार देत असेल तर भारतीय विमा विनियामक आणि विकास प्राधिकरणाच्या विमा लोकपालाकडे आपण तक्रार दाखल करू शकाल.